Pages

Thursday, 2 August 2018

मंतरलेले दिवस

शेजारचा तामण बहरू लागला, पळसाला लाल - केशरी फुले यायला लागली तशी शिशिर ऋतू संपून वसंताच्या आगमनाची चाहूल लागली. कुंडीतल्या कडीपत्ता ची पाने जुनाट झालेली म्हणून आईने छाटणी केली. लगेच दोन तीन दिवसात कोवळी पाने उमलू लागली. एके दिवशी बाल्कनीत फेरफटका मारताना इवल्याश्या कोवळ्या पानावर इटूकले फुलपाखराचे अंडे दिसले. लिंबाच्या रंगाचा जेमतेम २ मिलिमीटर चा व्यास असलेला चेंडूसारखा आकार. लगेच आईला खबर गेली. थोडंस इथे तिथे न्याहाळलं तर अजून दोन दिसले. स्वारी एकदम खूष. 

मॅक्रो फोटोग्राफी करताना नाना प्रकारच्या फुलपाखरांचे फोटो काढले होते आणि त्या अनुषंगाने थोडा अभ्यास सुरू होता. पण खरेतर या वाचनाला निरीक्षणाची आणि प्रात्यक्षिकाची जोड मिळाली जेव्हा रोहन क्षीरसागर ने माझ्या आवडी ओळखून मला पानफुटी ची काही पाने आणून दिली. त्याच्या घरी कुंडीत लावलेल्या पानफुटी च्या पानावर Red Pierrot नामक फुलपाखराचे कोष होते. त्यातील काही पाने त्याने मला निरीक्षणासाठी आणून दिली. खूप खूप आभार रोहन. रोज त्या पानफुटी च्या पानावरील कोषाचे निरीक्षण करायचो, फोटो काढायचो. त्यातून फुलपाखरू बाहेर यायची आतुरतेने वाट पहायचो आणि त्यामुळे रोज हापिसात जायला उशीर व्हायचा. एकदा तर कोष काळा झालेला पहिला आणि कॅमेरा घेऊन त्यासमोर ठाण मांडून बसलो. कोषातून इवलेसे सुंदर फुलपाखरू बाहेर येताना प्रत्यक्षात पाहून एक वेगळीच अनुभूती होते. त्याचे हवे तसे काही फोटो मिळाले आणि प्रदर्शनात देखील लागले.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की पानफुटीवरच ही फुलपाखरे का? तर प्रत्येक फुलपाखरू एखाद्या विशिष्ट वनस्पतीच्या पानांवरच अंडी घालतात. अंड्यातून निघालेल्या अळ्या केवळ त्या वनस्पतीची पाने खाऊनच गुजराण करतात.  उदाहरणादाखल रेड पीरो (Red Pierrot) जसे पानफुटी वर अंडी घालते तसेच कॉमन मॉरमॉन (Common Mormon) नावाचे फुलपाखरु कडीपत्तावर, लाईम बटरफ्लाय (Lime Butterfly) नावाचे फुलपाखरू लिंबाच्या झाडावर, कॉमन ब्यारॉन (Common Barron) आंब्याच्या झाडावर, ब्लू मॉरमॉन (Blue Mormon) संत्र्याच्या झाडावर अंडी घालते. त्यामुळे आपल्याकडे जेव्हडी अधिक जैव विविधता असेल तेव्हडी जास्त प्रकारची फुलपाखरे आपल्या सभोवताली दिसतात.

Common Mormon Butterfly

गेल्या दोन वर्षांपासून कडीपत्ता वरील फुलपाखरांचे, त्यांच्या जीवनाप्रणाली चे निरीक्षण करत होतो. कधी कधी अळ्या मोठ्या व्हायच्या आणि अचानक गायब व्हायच्या. पक्षी, माकड, सरडा, पाल, यापैकी कोण खायचे का अजून वेगळे काही घडायचे, काही कळायला मार्ग नसायचा. कित्येक वेगवेगळ्या रंगाच्या अळ्या पहिल्या, फोटो काढले. काहींनी कोष बनवला, फुलपाखरू बनून उडून गेले. पण हे सगळे तुटक तुटक. यावेळेस कडीपत्ता वर ६ अंडी दिसताक्षणीच ठरवले की ह्यांच्या जीवनाप्रणाली चा पूर्ण अभ्यास करायचा आणि त्यांचे खूप सारे फोटो काढायचे. अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखे त्या अळीचे आकारमान, रंग, व्यवहार याची व्यवस्थित नोंद करत गेलो.  

निरीक्षण खालीलप्रमाणे -

दिवस पहिला, २१ फेब्रुवारी २०१८ - कडीपत्ता च्या पानांवर गोलाकार व पिवळसर रंगाची ६ अंडी आढळून आली. अंड्याचा व्यास जेमतेम २ मिलीमीटर होता तर रंग हुबेहूब लिंबासारखा.

दिवस दुसरा, २२ फेब्रुवारी २०१८ - इवल्याश्या अंड्यात बारीकसा तपकिरी ठिपका दिसायला लागला.


दिवस तिसरा, २३ फेब्रुवारी २०१८ - अंड्याचा पिवळसर रंग बदलून तपकिरी झाला. त्यात जीव असल्याची खूण होती ती. दिवस चौथा, २४ फेब्रुवारी २०१८ - आज शनिवार असल्याने हापिसात सुट्टी होती आणि त्यामुळे निरीक्षणास बराच वाव होता. सकाळी साडे-दहा वाजण्याच्या सुमारास अंड्यातून एक अळी बाहेर आली असेल. मी पहिले त्यावेळेस ती इवलीशी २ ते ३ मिलीमीटर लांबीची केसाळ तपकिरी रंगाची अळी अंड्याचे कवच खाण्यात मग्न होती. अंड्याचे कवच फस्त करून, थोडी विश्रांती झाल्यावर तिने तिचा मोर्चा पानांकडे वळवला. दुपार ते रात्र तिने कडीपत्ता च्या कोवळ्या पानांचा थोडा भाग खाल्ला होता.

अळी अंड्याचे कवच खाताना

दिवस पाचवा, २५ फेब्रुवारी २०१८ - बहुतेक दिवस - रात्र तिची खादाडी सुरूच असावी कारण त्या अळीची लांबी आज ५ ते ६ मिलीमीटर झाली होती. दुसरे कामच काय म्हणा. म्हणजे केवळ एका दिवसात आपल्या शरीराच्या दुप्पट वाढ झाली होती तिची.

दिवस सहावा, २६ फेब्रुवारी २०१८ - पहाटेच कधीतरी त्या अळीने कात टाकली होती. सकाळी उठून पाहण्यासाठी गेलो तेव्हा कात टाकून नव्या रूपात ती सजली होती. शरीरावर मध्यभागी तसेच डोके व शेपटी जवळ असे तीन फिकट पांढरे पट्टे दिसत होते. पानावर शेजारीच जुनी कात चिकटून होती. अंघोळ करून हापिसात जायला निघालो तेव्हा जुनी कात खाण्यात ती व्यस्त झाली होती.

कात टाकलेली अळी

दिवस सातवा, २७ फेब्रुवारी २०१८ - आज सातव्या दिवशी तिची लांबी होती १२ मिलीमीटर तर डोक्याचा भाग ३ मिलीमीटर जाडीचा आणि शेपटाकडचा भाग २ मिलीमीटर जाडीचा झाला होता.

दिवस आठवा, २८ फेब्रुवारी २०१८ - कोवळ्या पानांच्या कडा  कुरतडल्या जात होत्या, हलकेच कुरुम कुरुम आवाज येत होता. दिवसेंदिवस कमालीच्या वेगाने ती खात होती, वाढत होती. आज १५ मिलीमीटर पर्यंत तिची वाढ झाली होती.
दिवस नववा, १ मार्च २०१८ - आज अळी १७ ते १८ मिलीमीटर पर्यंत वाढली होती. त्वचेवरील केस / काटे थोडे कमी  झाले होते. 

दिवस दहावा, २ मार्च २०१८ - रोज अंदाजे २ मिलीमीटरने वाढणारी अळी आज २० ते २१ मिलीमीटर लांबीची झाली होती. तिचा त्वचेचा तपकिरी रंग बदलून शेवाळी हिरवा झाला होता. पांढरे डाग गडद दिसू लागले होते. निरीक्षण करताना तिला चुकून हात लागला तर तिने लगेच डोक्यावरून गडद लाल रंगाची सोंड बाहेर काढली. धोका जाणवला की शत्रूला चकित करण्यासाठी अथवा घाबरवण्यासाठी हि युक्ती आहे. 


शत्रू ला घाबरवण्यासाठी अळी असे आक्रमक रूप धारण करते व भडक लाल रंगाची सोंड बाहेर काढते

दिवस अकरावा, ३ मार्च २०१८ - अकराव्या दिवशी त्या अळीची लांबी २५ मिलीमीटर असून, डोक्याकडचा भाग ६ ते ७ मिलीमीटर जाडीचा तर शेपटाजवळ चा भाग ४ मिलीमीटर जाडीचा होता. त्वचेवरील पांढरे डाग जाड व जास्त गडद दिसत होते. स्वतःच्या संरक्षणाकरिता ह्या अळीचा रंग पक्ष्याच्या विष्ठेसारखा दिसतो त्यामुळे पक्षी, पाल, सरडा इत्यादी त्या अळीकडे भक्ष्य समजून आकृष्ट होत नाही व त्यांच्यापासून अळीचे संरक्षण होते.  

शत्रूला चकवण्यासाठी पक्ष्याच्या विष्ठेसदृश रंग

दिवस बारावा, ४ मार्च २०१८ - बाराव्या दिवशी सकाळीच त्या अळीने कात टाकून स्वतःचे रूप पालटले होते. शेवाळी हिरव्या - तपकिरी रंगाची त्वचा आता पोपटी हिरव्या रंगाची झाली होती,  मोठे काळेभोर डोळे व त्यांना जोडणारी नक्षीदार पिवळसर रेघ व पोटाजवळचे तपकिरी रंगाचे पट्टे फार सुंदर दिसत होते. हे मोठाले डोळे खरेखुरे डोळे नसून शत्रूला घाबरवण्यासाठी व स्वतःच्या संरक्षणासाठी आहेत. लांबी २८ ते ३० मिलीमीटर, डोक्याजवळील भाग ८ मिलीमीटर जाड तर शेपटाकडील भाग ४ मिलीमीटर जाडीचा झाला होता. खादाडी बरीच वाढली होती. 
फुलपाखराच्या अळ्या जसजश्या मोठ्या होत होत्या, मनात भीती वाढत होती. पूर्वानुभवाने माहीत होते की अळ्या मोठ्या झाल्या की पक्षांच्या नजरेस येतात आणि खाल्ल्या जातात. त्यामुळे दोन्ही कुंड्या मी घरात आणून ठेवल्या होत्या. रोज त्या अळ्यांचे निरीक्षण करायचो, लिहून ठेवायचो. कडीपत्ताच्या एका झाडावर चार आणि दुसऱ्यावर दोन अळ्या होत्या. त्यापैकी पाच जवळपास १२ दिवसाच्या असून छान हिरव्यागार झाल्या होत्या. नुसती खादाडी सुरू असायची आणि जागोजागी विष्ठेचे गडद हिरव्या - काळ्या रंगाचे टपोरे दाणे विखुरलेले असायचे. दोन चार दिवसातच त्यांचे कोषात रूपांतर होणार होते. दिवसातून पाच सहा वेळा झाडून घेऊन आई कंटाळायची.
दिवस तेरावा, ५ मार्च २०१८ - अळीचा सुंदर हिरवा रंग आज जास्त गडद झाला होता. जेव्हडी जास्त पाने खाईल तेव्हडी अळीची वाढ होत जाते. कडीपत्ता ची फांदी उघडी बोडकी दिसू लागली होती. जमिनीवर तिच्या विष्ठेचे हिरवे दाणे इतस्ततः विखुरलेले असायचे. तेराव्या दिवशी तिची लांबी ३८ मिलीमीटर, डोक्याची जाडी १० मिलीमीटर तर शेपटीकडची जाडी ५ मिलीमीटर झाली होती. 

पाने खाऊन धष्टपुष्ट झालेली अळी

दिवस चौदावा, ६ मार्च २०१८ - फुलपाखराची अळी आता खूप जास्त खायला लागली होती. दिवसेंदिवस तिची भूक वाढली होती. विष्ठेचे दाणे इतस्ततः पडलेले असायचे. जेव्हडी जास्त खादाडी तेव्हडी जास्त विष्ठा. रोज जवळपास २ मिलीमीटर ने वाढणारी अळी आता रोज ६ ते ७ मिलीमीटर ने वाढत होती. तिच्या शरीरावरील ७ व डोक्याजवळील २ असे एकूण ९ वेगवेगळे भाग व्यवस्थित दिसत होते. आज तिचे शरीर ४३ मिलीमीटर लांब, डोक्याजवळ १० मिलीमीटर जाड तर शेपटाकडे ५ मिलीमीटर जाड झाले होते.

पाने खाताना चा विडिओ येथे पहा - 

रात्री हापिसातून घरी आल्यावर कॅमेरा ने त्यांचे फोटो काढले आणि पाने खाताना चा एक व्हिडिओ बनवला. लांबी, रुंदी, जाडी, रंगातील फरक वगैरे नमूद केले. चार पैकी दोघे एकाच फांदीवर पाने खाऊन समोरासमोर सुस्त बसून होते. कधीतरी त्यांना एकमेकांना ओलांडून पुढे जावे लागणारच होते आणि त्यात त्यांचा झगडा पक्का होता. झगडा होताना त्या डोक्याने एकमेकांना ढूश्या देतात. रात्री उशिरापर्यंत असे काही झाले नाही. सकाळी उठून नेहमीच्या कुतूहलाने झाडांजवळ गेलो, चार पैकी एक अळी दिसली नाही. बाकीच्या तीन अळ्या खादाडी करण्यात मग्न होत्या. इथेतिथे शोधताना जीव कासावीस होत होता. कुणा पक्ष्याने खाण्याचा संभव नव्हताच. नक्कीच झगडा झाला असणार आणि एक झाडावरून खाली पडली असणार. भिंतीवर कुंडीपासून जवळपास एक मीटर अंतरावर, भिंतीवर विष्ठेचे डाग दिसले. कोष बनवताना अळी तिच्या पोटातून सगळी घाण बाहेर काढते आणि शरीरातील चिकट द्रव्यापासून बनवलेल्या दोरीने स्वतःला कुठल्याश्या फांदीवर अडकवून घेते. खूप शोधाशोध केली, आजूबाजूचे सगळे फर्निचर हलवले, अर्धा पाऊण तास कुंडीजवळचा कोपरा न कोपरा धुंढाळला पण सापडली नाही.दिवस पंधरावा, ७ मार्च २०१८ - फुलपाखराची अळी खूप खादाडी करून जास्तीत जास्त वाढली होती. ती आता कोष बनण्यास उत्सुक झाली होती. ती आता कोष बनवण्यास इथे तिथे फिरत होती. बहुतेक काल अचानक गायब झालेली अळी  अशीच योग्य जागेच्या शोधात कुठेतरी अडगळीच्या जागी निघून गेली असावी आणि पालीच्या भक्ष्यस्थानी पडली असावी. ह्या हिरव्या अळीने स्वतःला कोष बनवण्यासाठी एक योग्य जागा शोधली आणि तेथे स्वतःच्या तोंडातून काढलेल्या रेशीम सदृश तंतू ने फांदीला लटकवून घेतले. ती आता थोडी आकुंचन पावू लागली होती आणि त्यामुळे चमकदार हिरवा रंग आता फिकट वाटू लागला होता. कालच्या ४३ मिलीमीटर लांबीवरून आज तिची लांबी २२ मिलीमीटर झाली होती. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिने स्वतःचे हिरव्या कोषात रूपांतर केले. तब्बल ६ मिनिटे तिचा स्वतःशी संघर्ष सुरु होता. ती आता अंतर्बाह्य बदलली होती. थोड्याच वेळात अजून एका अळीने देखील कोष बनवला. परंतु त्यास तिने पंधरा नाही तर अठरा दिवस घेतले. इतर दोन अळ्या  देखील मोठ्या आणि हिरव्या झाल्या होत्या. 

कोष बनण्यापूर्वी आकुंचन पावलेली अळी 

अळीचा झाला कोष

दिवस सोळावा, ८ मार्च २०१८ - आता दोन फुलपाखराच्या अळ्यांचे कोष होते तर इतर दोन अळ्यांनी सुद्धा स्वतःला झाडाच्या फांदीला लटकवून घेतले. रात्री त्या दोघांनी कात टाकून कोषात रूपांतर केले. आदल्या दिवशी झालेले कोष गडद हिरव्या रंगाचे व चकाकदार झाले.

 फुलपाखराच्या अळीचा कात टाकून कोषात  रूपांतर होतानाच व्हिडिओ येथे पहा - आपल्याला शरीरावर कुठेही खरचटले आणि थोडीशी त्वचा निघाली तर किती जळजळ होते. परंतु काही प्राणी जसे साप आणि कीटक जेव्हा कात टाकतात व नवीन रूप धारण करतात तेव्हा त्यांच्यासाठी ते खरेच सोप्पे असेल का त्यांना देखील आपल्यासारखाच त्रास होत असेल? ते त्यांच्या भावना व्यक्त करीत असतील का निमूट सहन करीत असतील?


दिवस बाविसावा, १४ मार्च २०१८ - चार कोषांत फुलपाखरू बनायची प्रक्रिया सुरु होती तर पाचवी पूर्ण वाढ झालेली अळी दिवसा  ढवळ्या अचानक नाहीशी झाली. 

दिवस तेवीसावा, १५ मार्च २०१८ - एकूण ४ कोषांपैकी एक, ज्याचे आपण वर निरीक्षण लिहिले आहे तो थोडा काळसर व्हायला लागला. कॉमन मॉरमॉन  फुलपाखरू काळ्या रंगाचे असते. तो त्याचा पंखांचा काळसर रंग कोषात दिसू लागला होता. इतर दोन कोष अजून हिरवे दिसत होते. 

कोषातून फुलपाखरू बाहेर येण्याची वेळ आली कि कोषाचा रंग बदलतो.

दिवस चोविसावा, १६ मार्च २०१८ - आणि अखेर ज्याची आतुरतेने वाट पहिली तो क्षण आलाच. सकाळी उठल्यापासून मी झाडाजवळ जाऊन बसलो होतो. सकाळी ८ वाजून पंधरा मिनिटांनी कोषात  हालचाल जाणवली. काळ्याकुट्ट कोषाचा पारदर्शक पापुद्रा हळू हळू विलग होऊ लागला. फुलपाखरू कोष तोडून बाहेर आले आणि थोडेसे विसावले. त्याचे पंख दुमडलेले होते, ओले होते. पाण्यासारखा द्रव त्या कोषात दिसून येत होता. पंखात रक्ताभिसरण सुरु झाले, पंख पूर्णपणे उघडले आणि थोड्या वेळाने तो नाजूक सुंदर जीव उडायला लागला. 

दिवस पंचविसावा, १७ मार्च २०१८ - दुसऱ्या कोषातून पहाटे ५ वाजताच फुलपाखरू बाहेर आले. 

'अंडे - अळी  - कोष - फुलपाखरू' अशी जीवनप्रणाली पूर्ण होण्यास एका अळीला चोवीस तर दुसऱ्या अळीला सत्तावीस दिवस लागले. अश्याप्रकारे हि अंड्यातून अळी, कोष व फुलपाखरु होण्याची प्रक्रिया  साधारण २५ ते ३० दिवसात पूर्ण होते. 

फुलपाखराचे जीवन मुख्यतः चार भागात विभागता येते - १. अंडे, २. अळी, ३. कोष, ४. फुलपाखरू.

आपल्याकडे जेव्हडी अधिक जैव विविधता असेल तेव्हडी जास्त फुलपाखरे आपल्या सभोवताली दिसतात. याचे कारण म्हणजे प्रत्येक फुलपाखरू एक विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीवर अंडी घालतात आणि त्याच वनस्पती ची पाने खाऊन अंड्यातून निघालेली अळी स्वतःची गुजराण करते. वेगवेगळ्या जातीच्या फुलपाखरांची अंडी वेगवेगळ्या आकारांची आणि रंगाची असतात. मुखतः पिवळ्या, नारिंगी, हिरव्या अथवा पांढऱ्या रंगछटेची ही अंडी गोल चेंडूसारखी, लांबट बाटलीसारखी, पसरट बशी सारखी वगैरे असतात. शक्यतो अंडी कोवळ्या पानांवर घातली जातात.

शिकाऱ्याला फसवणारे खोटे डोळे 
अंड्यातून छोटीशी अळी बाहेर आल्यावर नुसती खादाडी करत सुटते. सगळ्यात आधी ती स्वतःचे अंडे  खायला लागते आणि मग झाडाच्या कोवळ्या पानांकडे आपला मोर्चा वळवते. पानाचा थोडा भाग खाल्ला की  एक  झोप काढायची आणि मग पुन्हा खादाडी सुरु.

जेवायचे, झोपायचे आणि शी करायचे एव्हढाच काय तो उद्योग. आणि हा उद्योग दिवस रात्र सुरु असतो.  जसजसे खाईल तसतसे तिची वाढ सुरू असते. पहिल्या दिवशी फक्त २ मिलिमीटर लांबी असलेली अळी  केवळ १० दिवसात ४० मिलिमीटर पर्यंत वाढते. इतक्या विलक्षण गतीने शरीराची वाढ होत असताना ती अळी कात टाकत असते, स्वतःचा रंग, आकार, रूप बदलत असते. इंग्रजीत त्याला INSTAR असे म्हणतात. फक्त अळी असतानाच चार ते पाच वेगवेगळी रूपे असतात. प्रत्येक वेळेस कात टाकायच्या आधी ती निद्रावस्थेत जाते. काही वेळ काहीच न खाता ती निपचित पडून असते. कात टाकली कि तिचा रंग बदलतो. पुन्हा खादाडी सुरु. अळीतून कोषात रूपांतर होतानाच्या प्रक्रियेत तर ती अंतर्बाह्य बदलून जाते. त्यावेळेस तिची खादाड अवस्था संपलेली असते. आपल्या पोटातील सगळी घाण काढून टाकून ती स्वतःचं शरीर आकुंचित करते व रेशीम सदृश्य दोरीने स्वतःला झाडाच्या फांदीला अडकवून घेते. कात टाकताना तिची ज्या प्रकारे धडपड सुरू असते ते बघताना तिचा त्रास आपल्याला जाणवतोच. त्याचवेळेस या  बदललेल्या रुपबद्दल कुतूहल देखील निर्माण होतं. कोषात रूपांतर झाल्यावर पुढील दहा दिवसांत त्यास पंख, सोंड येऊन त्याचे फुलपाखरू होतानाच्या निद्रावस्थेत त्याच्या शरीरात अगणित बदल घडत असतील. ती नेमकी प्रक्रिया या चिकित्सक मनुष्याला कधीतरी कळेल काय?

निसर्ग हा अनेक रोचक घटकांनी बनलेला आहे. केवळ झाडाझुडुपांच्या हिरव्या रंगातच कित्येक छटा आहेत. फुलपाखरांवर ज्या प्रमाणे रंगांची मुक्तहस्ते उधळण केलेली आढळते त्याचप्रमाणे त्यांच्या अनेक गूढरम्य गोष्टी देखील मानवाच्या आवाक्याबाहेर आहेत. मनुष्यातील उपजत कुतूहल आणि निरीक्षण शक्ती पणाला लावून देखील अनेक गोष्टींची उकल आपल्याला होऊ शकत नाही हेच खरे. कॉमन मॉरमॉन जातीच्या फुलपाखराच्या नर  आणि मादी मधील फरक
- समीर पटेल 

Monday, 24 July 2017

पेंच मधील जंगल सफारी

आयत्या वेळेस संपलेल्या हापिसच्या कामामुळे गडबडीत कसेबसे एकदाचे पेंच व्याघ्र प्रकल्पात सफारी साठी जाणे झाले होते. त्यातच पावसाच्या हजेरीने वातावरण तंग होतं. गत अनुभवावरून अश्या ढगाळ वातावरणात व्याघ्रदर्शन थोडे दुर्लभ होते हे माहित होतेच परंतु जंगलात कुठल्याही क्षणी कुठलाही चमत्कार होऊ शकतो हे देखील माहित होतेच. प्रथमच जंगल सफारी ला येणारी व व्याघ्रदर्शनासाठी उत्सूक मंडळी ह्या वातावरणाच्या खेळाबद्दल अनभिज्ञ होती आणि मी मात्र वाघोबा पहायचाच आणि इतरांनाही दाखवायचा असे मनाशी ठाण मांडून आलेलो असल्यामुळे तणावाखाली होतो. अर्थात चेहऱ्यावर त्याचा मागमूसही नव्हता. पहिल्या एक नव्हे दोन सफारी रिकाम्या गेल्या. तसे म्हणायला वानर, चितळ, सांभर, कोल्हे, जंगली कुत्रे, नीलगाय, जंगली डुक्कर वगैरेंसोबत अनेक सुंदर पक्ष्यांनी दर्शन देऊन झालं होतं. ढगाळ वातावरणात सबुरी संपत आलेली असतानाच तिसऱ्या सफारी ला संध्याकाळी मस्त पाऊसधारा कोसळल्या आणि जंगलाने जणू रूपच पालटले. न्हाऊन निघालेली झाडांची पाने हिरवीगार दिसू लागली. मावळतीच्या प्रकाशात प्रत्येक रंग उजळून दिसू लागला. ओल्या मातीचा सुवास आणि थंडगार वाऱ्याची झुळूक अंतरंगात एक प्रकारचा हुरूप आणि चैतन्य देऊन गेल्या.

त्यातच एका वळणावर जवळपास 25 जंगली कुत्र्यांचा कळप वाट ओलांडून गेला. त्यातील काही निवांतपणे पहुडले तर काहींचा खेळ सुरू होता. पुढे परतीच्या वाटेवर आणखी एक जंगली कुत्र्यांचा कळप रस्त्याच्या कडेलाच हरिणाची शिकार खाण्यात मग्न होता. छायाचित्रे घेता घेता लक्षात आले की आपल्या जिप्सि च्या चहूकडे जंगली कुत्रेच आहेत जणू नकळत त्यांनी आम्हाला घेरून टाकले होते. सफरीतील हा अनुभव त्यातल्या त्यात काहीतरी वेगळे पाहिल्याचे समाधान देऊन गेला परंतु वाघोबाचा काही मागमूस नव्हता. सूर्य क्षितिजावर पोहोचू लागला तसे आम्ही बाहेर पडू लागलो. पाऊस पडल्याने सकाळी वातावरण उघडेल व लख्ख सूर्य प्रकाश येईल ह्या आशेनेच जणू.
रात्री थोडे चांदणे पडले होते त्यामुळे आशा पल्लवित होती. सर्वांना ताकीद दिली असल्याने आणि बहुतेकांनी त्याचे पालन केलेले असल्यामुळे पहाटे 5 वाजता आमच्या तिन्ही जिप्सीनी जंगलाच्या प्रवेशद्वारावर पहिला नंबर लावला. वाह!! आज जंगलचा राजा पहायचाच ह्या दृढनिश्चयाने सकाळची सफारी सुरु झाली. वीसेक मिनिटानंतर एका ठिकाणी आम्हास ओल्या मातीत उमटलेले वाघाचे पंजे दिसले. अनुभवी चालकाने जागेच ओळखले कि हे अगदी ताजे पंजे आहेत म्हणजे वाघ जवळपासच असू शकेल. समोरून आमची दुसरी जिप्सि आली. त्यांनी देखील ते पंजे पाहिले होते. दोन्ही अनुभवी गाईड आणि चालक यांनी सल्लामसलत करून वाघ कुठल्या दिशेला गेला असेल यावर विचार करून गाडी त्या दिशेने दामटली. 5 मिनिटे फिरून त्याच जागी येऊन उभे राहिलो. दोन्ही जिप्सि समोरासमोर उभे राहून चर्चा सुरु झाली. वाघोबा जास्त लांबवर तर नसेल गेला? वाघ आहे का वाघीण? पिल्लांचे पंजे दिसत आहेत का? बोलताबोलता आमच्या गाईड ने मागे वळून पाहिले आणि तो ओरडलाच - टायगर टायगर रास्ता क्रॉस करेगा, वो देखो. लागलीच सगळ्यांनी मागे वळून पाहिले. शिकारी प्राण्याची चाहूल लागल्याने हरीण, सांभर, वानर इत्यादी कुठल्याही प्राण्याचा कुठलाही आवाज नसताना सुमडीमध्ये खाली मान घालून चाललेला वाघोबा आम्हा सगळ्यांना दिसला. कुणाला काहीच सुचले नाही. मी तर नुसते मठ्ठासारखे त्याकडे बघत बसलो. तो आला आणि गेला पण वातावरणात आता नुसता उत्साह संचरला होता. त्या गाईड ने सहज मागे वळून बघण्याचा अवकाश आणि वाघोबा दिसण्याचा योग नेमका जुळून आला होता. त्याने मागे बघितले नसते तर ??

आता एक दुवा हाती लागला होता आणि तो सोडायचा नव्हता. आता वाघोबाचा माग सुरु झाला. वाघ पुढे ज्या रस्त्यावर येण्याची शक्यता होती तेथेच जाऊन वाट पाहू लागलो. गाडीचा चालक आणि मार्गदर्शक यांची खरी कसोटी येथेच होती. जिप्सी चालक आणि मार्गदर्शकांच्या अनुभवाच्या ताकदीवर पुढे एकूण तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्याला रस्ता ओलांडून जाताना पहिला. 


सफारी मधील खरी गंमत ही इथेच असते कारण वाघ दिसणे हेच सर्व काही नाही. वाघासारख्या शिकारी प्राण्याची चाहूल लागताच संपूर्ण जंगल जागं होतं, शिकार होणाऱ्या इतर प्राण्यांचे धोक्याचे सूचक इशारे अक्ख जंगल नीनादून सोडतात. ते आवाज ओळखणे, त्यावरून इशारा देणारा प्राणी ओळखणे, तो इशारा नक्की वाघासाठीच कि कोल्हा, बिबट्या, जंगली कुत्रे इत्यादी अन्य शिकारी प्राण्यांसाठी हे ओळखणे, त्या आवाजाचा माग घेणे, त्यावरून वाघ अथवा अन्य शिकारी प्राणी कुठल्या दिशेला जात असेल ह्याचा अंदाज बांधणे, तो वाघाचा मार्ग कुठल्या रस्त्याला मिळू शकेल इत्यादी अंदाज बांधून योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळेस उपलब्ध असणे आणि इतक्या मेहेनतीनंतर व्याघ्र दर्शन मिळणे हीच खरी उपलब्धी आणि तोच अविस्मरणीय प्रसंग आपल्या मनात कायमचा कोरला जातो.

Tuesday, 14 February 2017

जांभळीच्या खोऱ्यातील वनभ्रमंती

कोळेश्वरला ट्रेक आहे, येतोस का? अशी विचारणा झाल्याबरोबर लगेचच मी हेमंत ला होकार देऊन टाकला होता. कित्येक वर्षांपासून कोळेश्वर पठार डोक्यात घर करून होता पण मुहूर्त काही निघाला नव्हता. कोळेश्वराच्या खालच्या अंगाच्या जंगलात फेरफटका मारायचा बेत आहे एव्हडेच कळले. काहीच माहिती न काढता मी ट्रेक ला गेल्याचे हे बहुतेक पहिले अथवा दुसरेच उदाहरण.  दिनांक ११ व १२ फेब्रुवारी २०१७. 

यतीन, रवी अण्णा आणि चमूसह रात्रभर प्रवास करून आम्ही पहाटे उजाडताना जांभळी गावात पोहोचलो. रात्रीच्या प्रवासात वाट चुकल्याने धोम जलाशयाला थोडा मोठाच वळसा पडला होता परंतु त्याच कारणाने आमचे कमळगडाच्या पायथ्याच्या गावातून कमळगडाचे जवळून दर्शन झाले. भल्या पहाटे तारेवर बसलेले पारवे, चिवचिव करत उडणारे इवलेसे जांभळे सूर्यपक्षी, गवताच्या टोकावर बसलेले गप्पीदास, धोम धरणाच्या पाण्यातील हळदीकुंकू बदक (Spot Billed Duck) बघून सगळे खुश झाले. जांभळी गावात पोहोचताच राऊ दादांनी आमचे स्वागत केले, लागलीच नाश्त्याचा आग्रह झाला. गरमागरम पोह्यांवर ताव मारतो तोच राऊ दादा म्हणाले, आपल्याला आज बरीच चाल आहे, पोटभर खाऊन घ्या. पोहे संपून ताटात गरमागरम भात, रुचकर आमटी आणि लोणचे वाढले गेले. काहीही आढेवेढे न घेता ते पोटातील कावळ्यांना पोहोचते झाले. मागोमाग चहा आलाच. रात्रभराच्या जागरणाचा शीण कुठच्या कुठे गडप झाला. दिवसभराच्या भटकंती करीता आवश्यक तेव्हडेच सामान - पाणी, दुपारचे जेवण, कॅमेरा, विजेरी (टॉर्च) वगैरे बॅग मध्ये घेऊन, पायात बूट चढवून सगळा चमू तयार झाला. गावात उशीरा पोहोचल्याने भटकंतीची सुरुवात पण तशी उशीराच झाली होती.  नक्की काय काय पाहायचे त्याबद्दल यतीन सोडून कुणालाच कल्पना नव्हती, काही ठरवले देखील नव्हते. 

नदीचे पात्र ओलांडून जाताना
अंजनी ची मनमोहक फुले
कोळेश्वर आणि रायरेश्वर यांच्या बेचक्यात वसलेले जांभळी गाव. येथे पोहोचायला वाईजवळील धोम जलाशयाला वळसा घालून जावे लागते. गावापलीकडेच अजून एक तलाव असून बांध बांधून जांभळी नदीचे पाणी त्यात अडवलेले आहे. बारा महिने त्यात मुबलक पाणी असल्यामुळे या भागात शेती व्यवस्थित होते. लांब दूरवर पूर्वेला पागोट्याच्या आकाराचा केंजळगड ह्या भूभागावर लक्ष देऊन उभा असतो. गावाच्या उत्तरेला ऐतिहासिक महत्व असलेले, शिवरायांनी जेथे स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली, ते सुप्रसिद्ध रायरेश्वराचे पठार तर दक्षिणेला घनदाट अरण्याने वेढलेले, कोळेश्वराचे प्राचीन मंदिर असलेले कोळेश्वराचे पठार दिसते. पश्चिमेला दूर दूर पर्यंत हिरवी गर्द राई. 'येता जावळी जाता गोवली'. आठवली का? चंद्रराउ मोऱ्यांना ज्यामुळे मस्ती चढली होती (जी नंतर शिवाजीराजांनी उतरविली) त्याच जावळीच्या घनदाट रानावनातील एक छोटासा भाग आम्ही आज बघायला जाणार होतो. सध्या राखीव प्रकारातील हा जंगलाचा भाग येथील उपस्थित वन्य जनावरांमुळे लवकरच अभयारण्य होण्याच्या मार्गावर आहे. राऊ दादा येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असून जंगलाची निगा राखणे, मानवनिर्मित जलस्रोतामध्ये नियमित पाणी सोडणे, वन्यप्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे, त्यांच्या अभ्यास करणे, त्यांच्या खाणाखुणा शोधणे, जंगलातील प्राण्यांच्या वहिवाटीच्या जागी कॅमेरा लावणे  इत्यादी कामे करतात. आज तेच राऊ दादा आणि अजून एक गावातील अनुभवी गृहस्थ (मामा) आमच्यासोबत येऊन वाट दाखवणार होते. 
चला लेको....म्हणत अरण्याकडे आमची वाट सुरु झाली. एक दोन तीन चार म्हणत म्हणत एकेक पक्षी दिसू लागले, पक्ष्यांचा किलबिलाट सुरूच होता. रवी अण्णा आणि जयकृष्णन  तर केवळ आवाजावरूनच पक्ष्यांची नावे सांगत. लालबुड्या बुलबुल, खाटीक, सातभाई, गप्पीदास, वटवट्या, जांभळा सूर्यपक्षी, कोतवाल, माळभिंगरी, वेडा राघू, ठिपकेदार होला, छोटा तपकिरी होला, टोईवाला पोपट इत्यादी अनेक विध पक्षी त्यांनी केवळ आवाजाने ओळखले आणि दाखवले. आम्ही बावचळल्यागत निरीक्षण करायचो, फोटो काढायचा प्रयत्न करायचो. एव्हाना आम्ही जांभळी नदीच्या पात्रात प्रवेश केला होता. माझा ट्रेक वर हा एक आवडता उद्योग - जमिनीवर पाय ना टेकवता केवळ दगडांवर पाय ठेवून तोल सांभाळत चालायचे. दगड गडगडला तर मग पंचाईत. परंतु अश्या जोखमीत  देखील नेमक्या दगडावर तो गडगडणार नाही ह्या विश्वासाने पाय ठेवायचा आणि समजा एखादा गडगडलाच तर त्यावरून तोल सांभाळण्याची कवायत करायची. त्या गोलाकार दगडांवरून चालताना मौज येत होती. नदीचे बरेचसे पात्र कोरडे होते पण एखादे ठिकाणी पाण्याचा प्रवाह सुरु असला कि जंगलातल्या निरव शांततेत त्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा खळखळ आवाज मन सुखावून जायचा. एखाद्या ठिकाणी साचलेल्या शांत पाण्यात विविध रंगाच्या छटा असलेले शेवाळ साचलेले असायचे. अंजनीच्या वृक्षाच्या खोडावर गुलाबी जांभळ्या रंगाच्या फुलांचा ताटवा सजलेला असायचा. एखाद्या वन्य प्राण्याची चाहूल लागते का याचा माग घेत नजर भिरभिरत असतानाच राऊ दादांचा आवाज यायचा - "चला.... सगळे आले का?" राऊदादांसाठी हि रोजचीच वाट त्यामुळे ते भरभर चालायचे, आमच्यासाठी मात्र नवीन वाट, तीदेखील घनदाट जंगलातील आणि त्यामुळे आमची उत्सुकता नेहमीच शिगेला असायची. वन्य प्राण्यांचा सुगावा लागतोय का कुठे ते ढुंढाळत असतानाच यतीन आणि प्रणोती जमिनीवर उमटलेले प्राण्यांचे ठसे पाहताना दिसले. निरीक्षणाअंती ते बिबट्याचे ठसे असल्याची नोंद करण्यात आली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्सुकता, एकाच वेळेस दिसायला लागले. एकामागोमाग एक असे बरेच पुसट ठसे दिसू लागले. एक ठसा मिळाला कि नजर अजून काहीबाही शोधायला लागते. हे बघा... हे अजून.. हे खूर - हरिणांचे, हे वेगळे आणि छोटे आहेत - साळींदराचे, लगेच उत्तरे पण मिळायची. आमच्यातील काही जण नियमित भटकंती करीत असल्याने त्यांच्याकडे जुजबी माहिती होतीच, नसली तर राऊ दादा आणि मामा त्यात भर घालायचे. आणि हे सगळे होते पाऊलवाटांवर. मानवी नव्हे वन्यजीवांचीच वाट. आज आम्ही त्यांच्या वाटेवरून चालत होतो.  

Giant Wood Spider
राऊ दादांकडून अधिकाधिक जंगलाची माहिती मिळत होती. कोळेश्वराच्या पठाराखालील उतारावरील एका झऱ्याला बारमाही पाणी असते. त्या झऱ्याचे पाणी लोखंडी पाईप द्वारे गावापर्यंत पोहोचण्याची सोय केलेली आहे. उतार असल्याने ते पाणी सहज खालच्या जांभळी गावापर्यंत पोहोचते आणि गावकऱ्यांची तहान भागवते. गावाकडे असणारी पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण इथे करावी लागत नाही. ह्या लोखंडी पाईप मधील पाणी वन्यजीवांकरिता देखील वापरले जाते. त्यासाठी तेथे तीन ते चार ठिकाणी छोटे तलाव बांधून त्यात झऱ्याचे पाणी सोडले जाते. एक दिवसाआड त्या तलावात पाणी सोडण्यासाठी राऊ दादा ह्या जंगलात फेरफटका मारतात. आम्हाला अश्याच एका तलावाजवळ जायचे होते पाणी भरून घेण्यासाठी. 

शेकरू चे घरटे

नख्यांनी ओरबाडल्याच्या खुणा

उंच झाडावर शेकरू ची वाळकी पाने व काटक्या वापरून बनवलेली तीन घरटी दिसली. एका झाडाच्या खोडावर नख्यांनी ओरबाडल्याच्या खुणा होत्या. वाघ व बिबट्या अनेक वेळा आपल्या हद्दीच्या सीमा आखताना नरम खोडाच्या झाडांवर अश्या प्रकारे नख्यांनी ओरबाडून खुणा करतात व त्या प्रदेशावर आपला हक्क सांगतात. असेच पुढे जात असताना पायवाटेशेजारी गवतात राऊदादांनी आम्हाला एक विष्ठा दाखवली. प्रथमदर्शनी ती बिबट्याची वाटली. प्रणोती ने ती चाळवून त्याचे निरीक्षण केले. त्यात हरीण अथवा रानडुक्कर सदृश प्राण्याचे केस, नखे, दात, हाडे इत्यादी आढळले. विष्ठेचा भलामोठा आकार पाहून ती एकतर मोठ्या बिबट्याची अथवा पट्टेदार वाघाची असावी असा अंदाज लागला. नक्की कुणाची ते सांगणे मात्र अवघड. प्रणोती म्हणाली - "ठसे दिसले तेव्हा विष्ठा पाहायची होती, आता विष्ठा दिसली आहे तर वाघोबा पण दिसला पाहिजे." 

बिबट्याची विष्ठादोनेक मिनीटातच तो मानवनिर्मित पाण्याचा स्रोत आला. येथे आम्हाला रानगव्याचे पायाचे ठसे आढळले. शेजारीच झाडाच्या बुंध्यावर एक कॅमेरा लावलेला आम्हाला दिसला. त्यात यापूर्वी पाण्यावर येणारे रानगवे, बिबटे, रानमांजर, साळींदर, वाघाटी, अस्वल, भेकर, सांभर इत्यादी वन्यप्राण्यांच्या नोंदी झालेल्या आहेत असे राऊदादांकडून समजले. "चला पाणी भरून घ्या." - दादांची हाक आली. सगळ्यांनी हात तोंड धुवून झऱ्याचे थंडगार पाणी पिऊन सोबतच्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. यापुढच्या रस्त्याला आम्हाला अजून दुसरा कुठला पाण्याचा स्रोत मिळणार नव्हता. ताजेतवाने होऊन पूढे निघालो. आलटून पालटून पायवाटेवरची  आणि नदीच्या  पात्रातील चाल असे आमचे सुरु होते. नदीचे पात्र आले कि माझा दगड - दगड खेळ सुरु व्हायचा. दूरवरून हुप्प्याचा हूऊप.... हूऊप असा आवाज कानी पडायचा. कुठल्याश्या दगडावर फळांच्या बिया असलेली हुप्प्याची विष्ठा पडलेली असायची. अस्वलाच्या विष्ठेत वाळवी व वारुळाची माती असायची. काळोख्या वाटेवर शिरताना जयकृष्णन आणि रवी अण्णा थांबून थांबून पक्ष्यांच्या आवाजाची चाहूल घेत असत. शेजारचे दोघे चौघे देखील थांबून निरीक्षण करायचे. असेच एका ठिकाणी घुबडाचा आवाज ऐकू आला पण निबिड अरण्यात त्याला केवळ आवाजाच्या दिशेला शोधणे शक्य झाले नाही. रानकोंबड्याचा आवाज तर एव्हाना परिचयाचा झाला होता. बांबूच्या काड्या तुटलेल्या दिसत होत्या, पाने विखुरलेली असायची, छोट्या झाडाच्या खोडाची निघालेली ओली साल गव्याची उपस्थिती जाणवून देत होती. एका ठिकाणी गवताळ भागात गवत इतस्थतः पसरलेले, विस्कटलेले वाटले, जणू एखाद्या प्राण्याची झटापट झाली असावी. यतीन आणि मी बारकाईने पहिले तर गवतावर लालसर डाग आढळले. एखाद्याला ओढून फरपटत नेल्यासारखे वाटत होते. आजूबाजूला निरखून पहिले असता एक दोन दगड लालेलाल झाले होते. पक्की खात्री पटली  होती. येथे एखाद्या हिंस्त्र प्राण्याने शिकार करून ती खाल्ली असावी. फरपटत नेलेल्या दिशेने मी मोर्चा वळवला. केसांचा पुंजका सापडला. एक दोन मीटर अंतराच्या फरकाने अजून पाच ते सहा ठिकाणी केसांचे पुंजके आढळले. आणि शेवटी पुरावा मिळाला. एक अर्धवट खाल्लेले तोंड आणि काही रक्ताळलेली हाडे सापडली. जबडा आणि त्यातील दातांची माळ अगदी जवळच होती. भेकर होते ते. बहुतेक दोनचार दिवसांपूर्वी बिबट्याने केलेली भेकराची शिकार असावी ती. वन्यप्राण्यांच्या वास्तव्याचा अजून काय पुरावा हवा होता? कदाचित आजूबाजूला झाडीमध्ये एखादा वाघ किंवा अस्वल दबा धरून बसलं असेल, चालता चालता अचानक रानगवा समोर आला अथवा अंगावर धावून आला, एखाद्याने काय करावे? सगळं ऐकून - पाहून शहारून जावे कि घाबरून पुन्हा मागे फिरावे कि वन्यजीवनाबद्दल असा एकेक उलगडा होत असताना, अनपेक्षित अनुभव मिळत असताना आनंदून जावे? सगळेच शहारले, सगळेच आनंदले. पुढे अजून काय अनुभव मिळणार होते देव जाणो. 

भेकराची शिकार 
अंजनीची फुले
एव्हाना ऊन्ह चढलं होतं पण जाणवत नव्हतं. वाट बऱ्यापैकी सावलीची होती. नजर भिरभिरत होती, पाचोळा उडत होता. काट्यांपासून वाचत पाय चालत होते. अंजनीच्या खोडावरील गुलाबी-जांभळी फुले मनमोहक होती. मोकळ्या जागी येताच जाणवणारी थंड वाऱ्याची झुळूक प्रसन्नता देत होती. नदीचे पात्र ओलांडून वाट डोंगर चढायला लागली. भुसभुशीत मातीत पाय रोवून केलेल्या छोट्याश्या चढाईनंतर एका मोकळ्या पठारावर आम्ही पोहोचलो. येथून पूर्वेकडचे विहंगम दृश्य नजरेस पडले. दूरवर केंजळगड राजांची आज्ञा मानून ह्या सदाहरित प्रदेशावर पहारा देत उभा ठाकला होता. रायरेश्वराजवळचा नाखिंडाचा डोंगर खुणावत होता. जेथपर्यंत जायचे होते तो टप्पा जास्त दूर नव्हता. एक विसावा घेतला, पाण्याचा घोट घश्याखाली गेला. येथून पुढे चढाई सोपी नव्हती. पर्यटकच काय गावकरी देखील येथे फिरकत नसल्याने मळलेली अशी वाट नव्हती, ती शोधावी लागणार होती. राऊंना काळजी नव्हतीच, जबाबदारी आता त्या जास्त अनुभवी मामांकडे होती आणि मामा त्यांची जबाबदारी लीलया पेलत होते. जंगलातील सगळ्या वाटांची खडानखडा माहिती त्यांना होती. कमरेला खोचलेला कोयता एव्हाना बाहेर निघाला होता, वाटेत येणारी काटेरी झुडुपे एका घावात नाहीशी होत होती. न दिसणाऱ्या वाटेवरून मामा आम्हाला घेऊन जात होते. वानरांनी का शेकरूने अर्धवट खाल्लेल्या फळांचा खच पडला होता. पाचोळा उडत होता, जमिनीवरील वाळक्या काड्या मोडत होत्या, वेली पायात अडकत होत्या. अनोळखी झाडाझुडुपांमध्ये काही ओळखीची पाने दिसत होती. जंगलात आता कडीपत्ता च्या पानांचा व रानफुलांचा सुगंध दरवळत होता. जंगल अधिकाधिक दाट होत होते, आणि एका ठिकाणी मामा थांबले, मागोमाग आम्ही. झाडाच्या पानांची सळसळ सुरु झाली होती. झुडुपांमध्ये वारा घुसू पाहत होता, मनाई करताच सूऊऊ...सूऊऊउ करीत घुमत होता. आम्ही आता कड्याजवळ पोहोचलो होतो. मामांनी आणि राऊदादांनी जागेचा अंदाज घेतला. थोडी शोधाशोध करून एका ठिकाणी उतरण्याचा निर्णय घेतला. "चला.... सगळे आले का?", राव दादांचा आवाज आला. 'हो', असे उत्तर ऐकताच झाडी कापत कापत दोघे उतरले. मागे मी आणि प्रणोती. त्यामागे बाकीचे हळू हळू येऊ लागले. तीव्र उतार आणि घसारा. झाडांच्या मुळांत पाय अडकत होते, कपडे काट्यात फाटत होते, घसरगुंडी होत होती, झाडांचा आधार मिळत होता. अचानक मामा आनंदले, म्हणाले - "घोरपड बघा, घोरपड." नजर फिरवली तर अगदी १५ ते २० फुटांवर एक भलीमोठी घोरपड आमच्या कवायतीकडे लक्ष देऊन शांत बसली होती. शेपटासकट लांबी साडे पाच ते सहा फूट भरेल अशी लांबलचक. झटपट कॅमेरा काढून दोन फोटो घेतले. तिच्या जवळ जाताच ती सावध होऊन झटपट सरपटत निघून गेली. परत आमची मार्गक्रमणा सुरु. 
घोरपड 
घसारा उतरून आम्ही थोड्या मोकळ्या जागेत पोहोचलो. वाऱ्याचा झोत एकदम अंगावर आला. सह्यधारेचा एक अप्रतिम नजारा आता आमच्या डोळ्यासमोर होता. खाली अक्राळ विक्राळ दरी होती. थोडा देखील तोल गेला असता तर आमचा कडेलोट झाला असता. दरीतील एका छोटेखानी डोंगराच्या आकारावरून मी लगेच त्याला ओळखले - चंद्रगड. त्याच्या डावीकडे मागे दूरवर प्रतापगड, शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार. उजवीकडे दरीत ढवळी नदीचे कोरडे पात्र होते, नदीकिनारी छोटेसे ढवळे  गाव. वाह वाह!! एकूण एक जण खूश. सूर्यराव डोक्यावर होते, आनंद साजरा करण्यासाठी पेटपूजा करण्याचे ठरले. उंबराच्या खाली सावलीत पथारी मांडून बटाट्याची भाजी आणि चपात्यांचा फडशा पडला. मिष्टान्न ,म्हणून केक वाटला गेला. 

थोडा आराम करून, शुद्ध हवा ऊरात भरून आम्ही परतीच्या प्रवासाला सज्ज झालो. तोच घसारा आता चढायचा होता. जंगलातील केवळ ह्याच भागात मिळणारे वेत कापून घरातील वापरासाठी मामांनी त्याची मोळी बांधून घेतली. परतीच्या वाटेवर पाऊले भराभर चालली होती. ह्या वेळेस दुसरा रस्ता घ्यायचा असे ठरले होते. जंगल शांत झाले होते. पशुपक्षी जणू दुपारची वामकुक्षी घेत असावेत. "चला...सगळे आले का?" असा राऊदादांचा आवाज तेव्हडा यायचा. त्यांच्या आणि आमच्या मध्ये जास्त अंतर पडले कि त्यांची शिटी वाजायची. एका मोकळ्या पठारावर येताच मामा थांबले. समोरच दिसणारी एक वाट झाडोऱ्यात जात होती. पण मामांची चलबिचल सुरु होती. ह्या जंगलाच्या वाटेने बांबूच्या बनात जाताना अचानक रानगव्याशी सामना होऊ शकतो हे त्यांच्या अनुभवी नजरेने ओळखले होते. काही अनुचित घडू नये हीच काळजी त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर होती. त्यांनी रस्ता शोधेस्तोवर सगळ्यांनी एक बसकण मारली आणि पाणी पोटात ढकलले. तीन चार मिनिटांनी मामांनी आवाज दिला आणि आम्ही सगळे त्यांच्या मागे निघालो. वाट नदी पात्रात उतरली व नदी ओलांडून पुढे गेली. बांबूच्या तुटलेल्या फांद्या, विखुरलेली पाने, ताजी विष्ठा गव्याच्या अस्तित्वाची चाहूल देऊन गेली. मनोमन मामांना आणि त्यांच्या अनुभवाला सलाम ठोकला. वन्य जीवांशी सामना टाळावा ह्याचा प्रयत्न त्या दोघांचा होता तर वन्यजीवांचे दर्शन व्हावे म्हणून आमचा जीव वरखाली होत होता. पण शेवटी सगळ्यांची सुरक्षा महत्वाची. 

काळा बुलबुल 
जांभळी नदीच्या मुख्य प्रवाहाला मिळणारे अनेक ओढे ओलांडत आम्ही निघालो. निळ्याशार आभाळाखाली असलेल्या हिरव्यागच्च जंगलातून एकेक टप्पे ओलांडून आम्ही जंगलाबाहेर पडत असताना नदीशेजारील एका झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट सुरु असलेला ऐकू आला. आपसूकच नजर गेली तर कळले कि अनेक छोटे छोटे पक्षी झाडावर गर्दी करून आहेत. दुर्बीणीतुन पाहून निरीक्षण केले. काळा  बुलबुल - रवी अण्णा ने माहिती दिली. माझ्यासाठी नवीनच, पहिल्यांदाच पाहत होतो. दबत दबत जवळ जायचा प्रयत्न करून त्या पक्ष्यांचे काही फोटो टिपले. बाकीचे मला सोडून पुढे निघून गेले की काय? असा विचार करून मी माघारी वळलो तर हे सगळे नदी पात्रात एका ठिकाणी स्तब्ध बसून काहीतरी पहायचा प्रयत्न करत होते. विचारपूस केल्यावर हेमंत हळूच पुटपुटला - Paradise Flycatcher. स्वर्गीय नर्तक? आश्चर्याने मी त्याने बोट दाखवलेल्या जागी पहिले तर लांबलचक शेपटीचा पांढरा पक्षी  झुडुपातून आत बाहेर करत होता. जवळपास २० मिनिटे प्रयत्न केल्यावर कुठे त्याचा एक व्यवस्थित फोटो मिळाला.

स्वर्गीय नर्तक
फोटो काढण्याच्या खटपटीत बराच उशीर झाला आणि काळोख व्हायच्या आत जंगलाबाहेर पडायचे होते म्हणून आता राऊ दादांची घाई सुरु झाली. भराभर पाय उचलत आम्ही एकदाचे बाहेर पडलो आणि मामांच्या घरी रात्रीच्या मुक्कामासाठी प्रस्थान केले. आजचा दिवस सार्थकी लागला होता.

टीप: जांभळीतील वन व्यवस्थापन समिती या भागातील भ्रमंती नियंत्रित करते व वनखात्याचे अभयारण्याशी निगडित सर्व अटी व नियमांचे येथे पालन केले जाते. येथे जाण्यासाठी वनखात्याची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. प्राण्यांची संपूर्ण अन्नसाखळी येथील निसर्गाने आणि स्थानिकांनी अबाधित राखली आहे आणि येथील स्थानिक हे जंगल अबाधित राखण्यास उत्सुक आहेत. मानव - वन्यजीव परस्परावलंबित्व जपल्याने काय मिळते त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हे जांभळीचे खोरे!

जांभळी गावातील शेतात असलेली गव्हाची कोवळी लोम्बी 
शेतात दिसलेला चंडोल पक्षी 
तलावाच्या काठावर ढिवर पक्षी 

आम्ही स्वच्छ केलेली सतीशिळा 
जांभळी मधून बाहेर पडताना खालच्या वाडीत एका देवळासमोर रस्त्याच्या कडेला अनेक विरघळी व सतीशिळा पडलेल्या दिसल्या. उत्सुकतेने तेथे जाऊन त्या पहिल्या, त्यातीळ एका सतिशीळेवरील माती काढून ती साफ केली, त्याचे फोटो काढले. मंदिर परिसरातील लोकांकडे विचारपूस केल्यावर कळले कि मंदिराचा जीर्णोद्धार करताना अश्या अनेक कोरीव शिळा गावकऱ्यांना जमीन उकरताना सापडल्या आणि अजाणते पणे लोकांनी त्या पुन्हा मंदिराच्या पायात गाडल्या. मंदिराच्या आवारात अजून काही भग्नमूर्ती, दीपस्तंभाचे दगडी खांब झाडाखाली ठेवले होते. ज्या काही शिळा, समाध्या बाहेर होत्या त्यावरील नक्षीकाम, कोरीवकाम जबरदस्त होते. एका चौकोनी दगडावर अष्टपाद (आठ पायांचे) कासव कोरलेले होते. स्त्री लढवय्या असलेल्या विरघळी पहिल्यांदाच माझ्या पाहण्यात आल्या होत्या. भाले व तालवारींनी लढणारे सैनिक, धनुर्धारी, घोडेस्वार, हत्ती, इत्यादी कोरीवकाम त्या शिळांवर होते. त्या कोरीव शिल्पांचे वैशिष्ट्य मी तेथे उपस्थित गावकऱ्यांना सांगून त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या इतिहासाबद्दल, या अमूल्य ऐतिहासिक ठेव्याबद्दल, त्यांच्या संवर्धनाबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न केला. अनेक स्थानिक लोकांना ह्याबाबतीत काहीच रस नसल्याचे निदर्शनास आले तर काहींनी उत्सुकतेपोटी सर्व लक्ष देऊन ऐकले.  

स्त्री लढवय्या 

 
इतस्ततः पडलेला ऐतिहासिक वारसा

मंदिराच्या आवारातील सतीशिळा, भैरव मूर्ती 

मंदिराच्या पायात गाडलेली विरघळ
आणि अश्या प्रकारे एका अविस्मरणीय ट्रेक ची सांगता झाली. आजपर्यंतच्या अनेक भटकंती पैकी लक्षात राहण्याजोगा अजून एक ट्रेक म्हणजे जांभळीच्या खोऱ्यातील वनभ्रमंती. 

भटकंती मधील भागीदार सभासद ज्यांच्यामुळे अविस्मरणीय अनुभव मिळाला - यतीन नामजोशी, रवी वैद्यनाथन, जयकृष्णन, चंद्रशेखर दामले, हेमंत नाईक, एलरॉय सेराओ, प्रतिष साने, प्रणोती जोशी

धन्यवाद.

सह्याद्रीत भटकंती करताना शिस्त बाळगा, सह्याद्री वाचवा.