Pages

Monday, 13 April 2015

ब्रह्मगिरी - दुर्ग भंडार

ब्रह्मगिरी - दुर्ग भंडार

सह्याद्री मधील पट्टीच्या भटक्यांना काही नवीन ठिकाणांची माहिती मिळाल्यावर तेथे जाईस्तोवर त्या ठिकणाबद्दलची एक अनामिक ओढ मनाला लागून राहाते. असेच काहीसे झाले होते 'दुर्ग भंडार' ह्या किल्ल्याबद्दल ऐकल्यावर आणि तिथली छायाचित्रे (फोटो) पाहिल्यावर. जाण्याचा योग अद्याप येत नव्हता. सन २००७ मध्ये ब्रह्मगिरी ला तशी भेट देऊन झाली होती परंतू त्या वेळेस ह्या ठिकाणाबद्दल पुरेशी माहिती नव्हती. गेल्या वर्षी आमच्या एका भटक्या मित्राने - मयुरेश जोशी ने फेसबुक वर ब्रह्मगिरी किल्ल्याची व हत्ती दरवाज्यातून चढाईची काही छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. त्याकडे इतके आकृष्ट झालो कि कधी एकदा ब्रह्मगिरी वर चढाई करायची आणि ह्या न पाहिलेल्या व अनेक लोकांच्या खिजगणतीतही नसलेल्या ठिकाणाला भेट द्यायची ओढ मनाला लागून राहिली. एकदाचा बेल भंडारा उधळायचाच असे ठरवून चैत्र गुढी पाडव्याला निघून हा बेत तडीस न्यायचा मुहूर्त निश्चित केला. दुर्ग भंडार हा ब्रह्मगिरी चाच एक भाग असल्याने तो देखील सोबत होऊन जाणार होता.

नेहमीप्रमाणे अनेक उत्सुक टाळकी तयार होतीच परंतु गुढी पाडव्याचा मुहूर्त आणि घरातील इतर महत्वाची कामे यांच्या कात्रीत सापडलेल्या मित्रांना त्यांच्या त्यांच्या घरीच सोडून शनिवार २१ मार्च रोजी रात्री १० वाजता  आम्ही सहा भटके (विनायक वंजारी, ज्योती डसके, सचिन वाडेकर, पंकज गिरकर, सदानंद आपटे काका  आणि मी - समीर पटेल) चार चाकीने त्र्यंबकेश्वर कडे रवाना झालो. गुडी पाडवा असल्यामुळे बरेचसे लोक घरी असावेत कारण इतर वेळेस रस्त्यावर असणारी गर्दी यावेळेस मात्र नव्हती. शिर्डीच्या श्री साई बाबांच्या पालखी सोबत पायी जाणारे अनेक भाविक मात्र खूप दिसले. सत्यवान (आमच्या चार चाकीचा चालक) ने गाडी भलतीच दामटली आणि आम्हाला पहाटे  २:३० वाजता त्र्यंबकेश्वर ला पोहोचवलं. झोप काही झाली नव्हती, उकाडा आणि डासांमुळे ती लागतही नव्हती. भल्या पहाटे प्रभातफेरी करून येऊ म्हणून ज्योती आणि पंकज सोडून बाकीचे आम्ही ज्योतिर्लिंगाच्या देवस्थानी पोहोचलो. मंदिर ५:३० वाजता दर्शनासाठी उघडणार होते. कुंडाजवळील महादेवाच्या मंदिराच्या भिंतीवरील विविध कोरीव शिल्प तसेच श्री विष्णू ची दशावतारी शिल्पे पाहून आम्ही पुन्हा चारचाकी पाशी परतलो. इतरांना उठवून पुन्हा मंदिरा कडे गेलो, श्री त्र्यंबकेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन आम्ही चहा, बिस्कीट आणि कांदेपोह्यांचा आस्वाद घेतला.

ब्रह्मगिरी म्हणजेच त्र्यंबकगड. नाशिक हून जवळपास २५ किलोमीटर वर असलेले, त्र्यंबकेश्वर हे पायथ्याचे गाव. येथील महादेवाचे मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असल्यामुळे प्रसिद्ध असून मागच्याच ब्रह्मगिरी पर्वतावर गौतमी गंगा अथवा गोदावरी नदी चे पवित्र असे उगम स्थान आहे. अनेक ठिकाणी उगम पाऊन, पुन्हा लुप्त होत शेवटी ती नाशिक मधील पंचवटी हून पुढे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते.

हत्ती मेट वाडीतून दिसणारा त्र्यंबक गड 
एव्हड्यात उजाडले होते आणि उन्हे वर यायच्या आत चढाई ला प्रारंभ करायचा होता. नेहमीच्या त्र्यंबक दरवाज्या ऐवजी हत्ती दरवाज्यातून चढाई करायची असल्या कारणाने आम्ही वाहनाने पलीकडच्या 'कोजूली' नामक गावात पोहोचलो. गावकऱ्याकडून जुजबी माहिती विचारून घेऊन बरोबर सकाळी ७:१५ वाजता चढाई ला प्रारंभ केला. एका धारेवरून मळलेल्या वाटेने चढत जाऊन मधल्या पठारावरील हत्ती मेट ह्या वाडीत जायचे होते. चढ तसा फार उभा नव्हताच आणि उन्हाचे चटके देखील जाणवू लागले नव्हते परंतु रात्रभर झोप नसल्यामुळे थोडा त्रास जाणवू लागला होता. किल्ल्याच्या उतारावर पूर्वीच्या काळी टेहळणी साठी चौक्या - पहारे असायचे त्यांना मेट असे संबोधले जायचे. हत्ती मेट हे असेच हत्ती दरवाज्यातून जाणाऱ्या वाटेवर पहाऱ्यासाठी असावे. हे हत्ती मेट म्हणजे ८० उम्बरांची वाडी. शेती, पशुपालन असे येथील लोकांचे व्यवसाय. दाणा गोटा डोक्यावर उचलून आणावा लागतो. पाण्याची टंचाई. वेताळ, मरीआई, हनुमान, अंबिका देवी असे ह्यांचे ग्राम दैवत पठारावर आहेत. पूर्वेला अंजनेरी पर्वत आपले अजस्त्र बाहू फैलावून सूर्यनारायणाचे स्वागत करीत होता पश्चिमेला हरिहर किल्ला, ब्रह्मा पर्वत आणि दोघांच्या मध्ये बसगड (भास्करगड) कोवळ्या सूर्य किरणांत न्हाऊन निघत होते.

अंबिका मंदिरा कडून नळीच्या दिशेने जाताना 
कातळ खोदीव पायऱ्या 


समोर दिसणाऱ्या कडयाला उजवीकडे ठेवून एका नळीतून हत्ती दरवाज्याची वाट जाते. वाडीतील लोकांची गोदातीर्थावर जाण्याची नेहमीची वाट असल्यामुळे बऱ्यापैकी मळलेली. अंबिका देवीच्या मंदिराजवळ काही वीरघळ विखुरलेल्या होत्या. गावकऱ्यांसाठी हे सगळेच देव. थोडी विश्रांती घेऊन ताजे तवाने होऊन पुढे नळीत चढायला प्रारंभ केला. वाट जेथे उजवीकडच्या कड्याला मिळते तेथे खडकात खोदलेल्या पायऱ्या आहेत. खालच्या पायऱ्या दरड कोसळल्यामुळे लुप्त झाल्या आहेत. येथून सभोवारचे दृश्य फार छान दिसत होते. नळीत काही ठिकाणी तटबंदी चे अवशेष देखील दृष्टीस पडले. पुढचा घळीतला रस्ता सावलीतून असल्यामुळे थंड वाऱ्याची झुळूक मनाला प्रसन्नता देत होती थकवा दूर करत होती. त्याच वेळेस दृष्टीला पडणारे विविध तटबंदीचे अवशेष उत्सुकता वाढवत होती. घळीत एक भली मोठी भिंत बांधून काढली आहे. पडझड झालेल्या भिंतीचे भले मोठे तुकडे येथे विखुरले आहेत. भिंतीमध्ये भुयारी मार्ग असावा कारण येथे दरवाज्याच्या कमानीसाठी दगडावर कोरीव काम केल्याच्या काही खुणा दिसल्या. परंतु काही वर्षांपूर्वी दरड कोसळल्यामुळे तो मार्ग पूर्णपणे बंद झालेला असून उजवीकडे भिंतीवर चढण्यासाठी शिडी लावली आहे. शिडी चढून वर गेल्यावर कळते कि भिंतीमध्ये कोनाडे आणि जंग्या आहेत. उजवीकडच्या कड्याला भिंत घालून बंदिस्त केले आहे.

भिंतीमध्ये मोठे भगदाड आहे तेथून पूर्वी मार्ग असावा 
मोठ मोठ्या प्रस्तारांवर चढून डावीकडे गेल्यावर एक कातळात कोरलेली गुहा आणि एक महादेवाचे मंदिर आहे. मंदिरात शिव पिंड असून छोट्या दरवाज्यातून कसेबसे आत डोकावून पाहिल्यास गाभाऱ्यात छतावर कमळ कोरलेले दिसते. बाकीचे थोडीशी पोटपूजा करत असताना मी व आपटे काका अजून काय अवशेष सापडतात म्हणून शोधू लागलो तर मंदिरा समोरच्या (घळीतून पाहिल्यास उजवीकडच्या) कड्यात अजून एक छोटी गुहा व त्यात उतरण्यासाठी ३ - ४ पायऱ्या दृष्टीस पडल्या. टेहळणी / पहाऱ्या साठी असलेल्या सुरक्षा रक्षकांना या दोन्ही गुहांचा उपयोग होत असावा.

महादेवाचे इटुकले मंदिर व रक्षकांसाठी गुहा 
हत्ती दरवाजा जवळील संरक्षक तटबंदी 
हत्ती दरवाजा व त्याचे संरक्षणार्थ असलेले बुरुज 
घळीत भले मोठे अगणित प्रस्तर पडलेले असल्यामुळे येथून पुढे त्या प्रस्तरांवरच आरोहण करून चढावे लागते. समोर उंचच उंच पंचलिंग शिखर साद घालत असते आणि दोन्ही बाजूंनी उंच तटबंदी मागून कुणीतरी आपल्यावर नजर ठेवून असल्याचा भास होतो. गडाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ह्या वाटेवरचे बांधकाम अतिशय छान  आहे. थोडे चढून गेल्यावर आपला मार्ग अडवणारी एक भिंत समोर येते आणि तेथ पर्यंत जाण्यास थोडा घसारा. त्यानंतर आपल्या दृष्टीला जे दिसतं ते केवळ अद्भुत पण तेव्हडच दुर्दैवी.

हत्ती दरवाज्या समोर पडलेला भला मोठा प्रस्तर आणि जमिनीत अर्धवट गाडल्या गेलेल्या हनुमान व इतर देवता. 
अर्धवट गाडला गेलेला हत्ती दरवाजा 
एक अतिशय सुंदर कोरीवकाम असलेला कातळात खोदून काढलेला महादरवाजा (हत्ती दरवाजा), त्याच्या दोन्ही बाजूस  - उजवीकडे दगडांनी बांधलेला भक्कम बुरुज तर डावीकडे कातळ तासून केलेला बुरुज आहेत. उजवीकडे भिंतीत एक वीर हनुमान आणि त्यापुढे काही अज्ञात शिल्पे आहेत. दुर्दैवाने महादरवाजा अर्धा अधिक जमिनीत गाडला गेला आहे. महादरवाजा वर कमलपुष्पे, व्याल आणि साखळीला अडकवलेला घंटा कोरलेले आहेत. महादरवाज्याच्या डावीकडील कातळावर चढून पुढे गेल्यावर काही अंतरावर अजून असाच एक दरवाजा दिसतो. पूर्वीच्या काळी येथे जमिनीच्या पृष्ठभागाखाली कातळात खोदलेली पायऱ्यांची वाट असली पाहिजे. ह्या कोसळलेल्या दरडीखाली प्रचंड इतिहास दडला गेला असेल. कित्येक महापुरुषांच्या पराक्रमाच्या गाथा आज ह्या मातीखाली लुप्त झाल्या असतील. हे सगळे स्वच्छ केल्यास किती सुंदर कोरीवकाम आपणास पहावयास मिळेल. अश्या मोठ्या शिळा बाहेर काढणे काही सहज सोप्पे काम नव्हे. ह्या दरवाज्यातून पुढे आपण गडावरच्या पठारावर, पंचलिंग शिखराच्या प्रदक्षिणेचा मार्गावर येतो.

सदानंद आपटे काकांनी पंचलिंग शिखराची प्रदक्षिणा व दुर्ग भांडार चा ट्रेक केला असल्यामुळे पुढील मोहिमेचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवले. शिखराला उजवीकडे ठेवून सरळ मार्गाने गेलो असता, वाटेत एका उंबराच्या झाडाजवळ अज्ञात व्यक्तीच्या समाधीचे दर्शन होते.

पूर्णपणे गाडला गेलेला दुसरा दरवाजा 

हत्ती दरवाज्यातून निघाल्यावर अर्धा तासाच्या चालीनंतर आपण गौतमी गंगेच्या - गोदावरी नदीच्या उगमस्थानी पोहोचतो. गंगा येथे एका कुंडात उगम पावते व पुन्हा लुप्त होते. अश्याच प्रकारे पुढे ती गोमुख, जटा मंदिर, गंगाद्वार अश्या ठिकाणी उगम पाऊन लुप्त होते. या प्रत्येक पुज्य स्थानी ब्राह्मण बसलेले असतात व त्या त्या ठिकाणाची महती सांगतात. गडावर पाणी मिळण्याच्या याच तुरळक जागा आहेत.

गोदावरी नदीचा उगम या कुंडात होतो 
 दुर्ग भांडार -

दुर्ग भांडार च्या दिशेला जाताना 
जटा मंदिरा जवळून सरळ पुढे २० मिनिटे चालत गेलो की आपण पोहोचतो त्र्यंबक गडावरील अजून एका अद्भुत ठिकाणी. याचे नाव दुर्ग भांडार. येथे जाताना तोल सांभाळूनच जावे कारण वाटेच्या उजवीकडे डोंगरधार तर डावीकडे खोल दरी. येथे माकडांचा वावर पुष्कळ. त्यांच्यापासून सांभाळूनच राहावे.

दुर्ग भांडार च्या पायऱ्या सुरु होतात 
दुर्ग भांडार वरील सुंदर कातळ कोरीव पायऱ्या
जेथे वाट संपते तेथे कातळात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला कड्याच्या तळाशी घेऊन जातात. कडा जणू मधोमध उभा चिरला आहे. पायऱ्या सुरु होतात तेथेच मारुतीराया खडकात खोदला आहे. जवळपास दीड फुट उंचीच्या या पायऱ्या उतरून गेल्यावर एक अर्धवट बुजलेल्या दरवाजातून सरपटत आपण एका अरुंद, ज्याची रुंदी जेमतेम ८ फूट असावी अश्या कातळधारेवर येतो. पुढे अजून अश्याच एका दरवाज्यातून सरपटत गेल्यावर पुन्हा पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून आपण आता गडाच्या एका टोकावर आलेलो असतो. अद्याप टोक गाठायचे असते. असेच पुढे चालत गेल्यावर दोन पाण्याची टाकी दृष्टीस पडतात. एका टाक्यातील पाणी थोडे हिरवे दिसले तरी पिण्यालायक आहे तर दुसऱ्या टाक्यातील पाणी पिवळे आहे. अनेक मधमाश्या असल्यामुळे आम्ही दबकत, आवाज न करता निसटलो आणि कड्याच्या टोकावर खडकात खोदलेल्या एका बुरुजापाशी आलो. बुरुजात उतरायला काही पायऱ्या असून ह्या स्थानाला कडेलोटाची जागा ,म्हणून संबोधतात. अतिशय सुंदर अश्या या स्थानाच्या दुर्ग भांडार या नावाची व्युत्पत्ती मात्र होत नाही.अखंड कातळात खोदून काढलेला त्र्यंबक दरवाजा 
गेल्या वाटेन पुन्हा जटामंदिराकडे येउन समोरचं टेकाड चढून एका टपरीवर लिंबू पाणी घेतलं आणि त्र्यंबक दरवाजा कडे मोर्चा वळवला. आपटे काकांनी माचीवर विखुरलेल्या अवशेषांची माहिती दिली आणि आम्ही पायऱ्यांच्या वाटेने उतरू लागलो. सरकारने नेहमी प्रमाणे संवर्धनाच्या आणि सुरक्षेच्या कारणास्तव रेलीन्ग्स लावल्या आहेत. सरकारच्या नावाने बोंबा मारत उतरत असतानाच एक म्हातारं जोडपं चढत असताना दिसलं. लागलीच डोक्यात प्रकाश पडला. आपल्यासाठी किळस वाणे वाटत असलेल्या ह्या रेलीन्ग्स चा गोदावरी उगमस्थानाच्या दर्शनासाठी येणाऱ्या म्हाताऱ्या बाया माणसांना किती उपयोग होत असेल. परंतू महत्वाचा त्र्यंबकदरवाजा तरी मोकळा सोडायला हवा होता. कंत्राटदाराने बिनडोक पणे काम केल्याचा हा नमुना आहे. असो.

त्र्यंबक दरवाजाने उतरल्यावर आपण येतो एका धर्मशाळेजवळ. फार सुंदर असे हे बांधकाम असून ह्याच्या सर्व भिंतींवर लोकांनी आपापली नावे चितारून ठेवली आहेत. त्याच्या मागे पाणी साठवण्यासाठी एक अतिशय सुंदर पुष्करणी असून त्याची एक भिंत मोडकळीस आलेली आहे.

धर्मशाळा 
धर्मशाळे च्या मागील बाजूस असलेली पुष्करणी 
 येथून पायऱ्यांच्या वाटेने खाली न उतरता सरळ गेलो की एक वाट डावीकडे कड्याजवळ जाते. हि पायऱ्यांची वाट गंगाद्वार कडे घेऊन जाते. येथे सुद्धा गौतमी गंगा एका गोमुखात उगम पावून, एका कुंडात जाऊन पुन्हा लुप्त होते. पुढे ती त्र्यंबकेश्वर गावातील पुष्करणी मध्ये उगम पावते. गंगाद्वाराच्या पुढे दोन गुहा असून एकात १०१ शिवलिंग स्थापित केलेली आहेत. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिने त्यांची स्थापना केल्याची व येथेच त्या दोघांचे वास्तव्य असायचे अशी कथा सांगितली जाते. त्या पुढची गुहा मच्छिंद्र नाथांची आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये पाहण्याचे अजून एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे संत श्री ज्ञानेश्वरांचे गुरु - संत श्री निवृत्ती नाथांचे समाधीस्थळ जेथे त्यांनी वयाच्या २० व्या वर्षी जिवंत समाधी घेतली.

एव्हड्या तंगडतोडीनंतर देखील अवाढव्य पसरलेल्या त्र्यंबकगडावर बऱ्याच गोष्टी (पंचलिंग शिखर, शिखर परिक्रमा, माचीवरील नानाविध अवशेष) पहायच्या अजून शिल्लक आहेत. सर्व तीर्थक्षेत्रांचे मनोभावे दर्शन घेऊन व पुढच्या भेटीच्या वेळेस हे राहिलेले सर्व पाहण्याचा संकल्प करून आम्ही संध्याकाळी ४:३० वाजता परतीच्या मार्गाला लागलो.

अधिक छायाचित्रांसाठी पहा -
https://picasaweb.google.com/112424448078863794767/TryambakgadDurgaBhandar
========================================================================

टीप : या सबंध भटकंती मध्ये माकडांचा खूप उपद्रव होतो त्यामुळे हातात काठी असलेली बरी. परंतु माकडे त्यांच्यावर काठी उगारताच अंगावर धावून येतात म्हणून त्यांच्यापासून लांब राहिलेलेच बरे. त्यांना काहीही खायला देऊ नये आणि पाठीवरच्या दप्तरात दिसेल अश्या प्रकारे काहीही खाण्याचे पदार्थ ठेवू नयेत.  शक्यतो एकट्या दुकट्याने ही  भटकंती मोहीम करू नये.
गोदावरी उगम स्थान सोडले तर त्र्यंबक गडावर इतरत्र पाण्याची सोय नाही. परंतू पर्यटकांचा राबता असल्यामूळे बाटलीबंद पाणी मिळू शकते.