शेजारचा तामण बहरू लागला, पळसाला लाल - केशरी फुले यायला लागली तशी शिशिर ऋतू संपून वसंताच्या आगमनाची चाहूल लागली. कुंडीतल्या कडीपत्ता ची पाने जुनाट झालेली म्हणून आईने छाटणी केली. लगेच दोन तीन दिवसात कोवळी पाने उमलू लागली. एके दिवशी बाल्कनीत फेरफटका मारताना इवल्याश्या कोवळ्या पानावर इटूकले फुलपाखराचे अंडे दिसले. लिंबाच्या रंगाचा जेमतेम २ मिलिमीटर चा व्यास असलेला चेंडूसारखा आकार. लगेच आईला खबर गेली. थोडंस इथे तिथे न्याहाळलं तर अजून दोन दिसले. स्वारी एकदम खूष.
मॅक्रो फोटोग्राफी करताना नाना प्रकारच्या फुलपाखरांचे फोटो काढले होते आणि त्या अनुषंगाने थोडा अभ्यास सुरू होता. पण खरेतर या वाचनाला निरीक्षणाची आणि प्रात्यक्षिकाची जोड मिळाली जेव्हा रोहन क्षीरसागर ने माझ्या आवडी ओळखून मला पानफुटी ची काही पाने आणून दिली. त्याच्या घरी कुंडीत लावलेल्या पानफुटी च्या पानावर Red Pierrot नामक फुलपाखराचे कोष होते. त्यातील काही पाने त्याने मला निरीक्षणासाठी आणून दिली. खूप खूप आभार रोहन. रोज त्या पानफुटी च्या पानावरील कोषाचे निरीक्षण करायचो, फोटो काढायचो. त्यातून फुलपाखरू बाहेर यायची आतुरतेने वाट पहायचो आणि त्यामुळे रोज हापिसात जायला उशीर व्हायचा. एकदा तर कोष काळा झालेला पहिला आणि कॅमेरा घेऊन त्यासमोर ठाण मांडून बसलो. कोषातून इवलेसे सुंदर फुलपाखरू बाहेर येताना प्रत्यक्षात पाहून एक वेगळीच अनुभूती होते. त्याचे हवे तसे काही फोटो मिळाले आणि प्रदर्शनात देखील लागले.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की पानफुटीवरच ही फुलपाखरे का? तर प्रत्येक फुलपाखरू एखाद्या विशिष्ट वनस्पतीच्या पानांवरच अंडी घालतात. अंड्यातून निघालेल्या अळ्या केवळ त्या वनस्पतीची पाने खाऊनच गुजराण करतात. उदाहरणादाखल रेड पीरो (Red Pierrot) जसे पानफुटी वर अंडी घालते तसेच कॉमन मॉरमॉन (Common Mormon) नावाचे फुलपाखरु कडीपत्तावर, लाईम बटरफ्लाय (Lime Butterfly) नावाचे फुलपाखरू लिंबाच्या झाडावर, कॉमन ब्यारॉन (Common Barron) आंब्याच्या झाडावर, ब्लू मॉरमॉन (Blue Mormon) संत्र्याच्या झाडावर अंडी घालते. त्यामुळे आपल्याकडे जेव्हडी अधिक जैव विविधता असेल तेव्हडी जास्त प्रकारची फुलपाखरे आपल्या सभोवताली दिसतात.
![]() |
Common Mormon Butterfly |
गेल्या दोन वर्षांपासून कडीपत्ता वरील फुलपाखरांचे, त्यांच्या जीवनाप्रणाली चे निरीक्षण करत होतो. कधी कधी अळ्या मोठ्या व्हायच्या आणि अचानक गायब व्हायच्या. पक्षी, माकड, सरडा, पाल, यापैकी कोण खायचे का अजून वेगळे काही घडायचे, काही कळायला मार्ग नसायचा. कित्येक वेगवेगळ्या रंगाच्या अळ्या पहिल्या, फोटो काढले. काहींनी कोष बनवला, फुलपाखरू बनून उडून गेले. पण हे सगळे तुटक तुटक. यावेळेस कडीपत्ता वर ६ अंडी दिसताक्षणीच ठरवले की ह्यांच्या जीवनाप्रणाली चा पूर्ण अभ्यास करायचा आणि त्यांचे खूप सारे फोटो काढायचे. अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखे त्या अळीचे आकारमान, रंग, व्यवहार याची व्यवस्थित नोंद करत गेलो.

दिवस दुसरा, २२ फेब्रुवारी २०१८ - इवल्याश्या अंड्यात बारीकसा तपकिरी ठिपका दिसायला लागला.
दिवस तिसरा, २३ फेब्रुवारी २०१८ - अंड्याचा पिवळसर रंग बदलून तपकिरी झाला. त्यात जीव असल्याची खूण होती ती.

दिवस चौथा, २४ फेब्रुवारी २०१८ - आज शनिवार असल्याने हापिसात सुट्टी होती आणि त्यामुळे निरीक्षणास बराच वाव होता. सकाळी साडे-दहा वाजण्याच्या सुमारास अंड्यातून एक अळी बाहेर आली असेल. मी पहिले त्यावेळेस ती इवलीशी २ ते ३ मिलीमीटर लांबीची केसाळ तपकिरी रंगाची अळी अंड्याचे कवच खाण्यात मग्न होती. अंड्याचे कवच फस्त करून, थोडी विश्रांती झाल्यावर तिने तिचा मोर्चा पानांकडे वळवला. दुपार ते रात्र तिने कडीपत्ता च्या कोवळ्या पानांचा थोडा भाग खाल्ला होता.
![]() |
अळी अंड्याचे कवच खाताना |
दिवस पाचवा, २५ फेब्रुवारी २०१८ - बहुतेक दिवस - रात्र तिची खादाडी सुरूच असावी कारण त्या अळीची लांबी आज ५ ते ६ मिलीमीटर झाली होती. दुसरे कामच काय म्हणा. म्हणजे केवळ एका दिवसात आपल्या शरीराच्या दुप्पट वाढ झाली होती तिची.
दिवस सहावा, २६ फेब्रुवारी २०१८ - पहाटेच कधीतरी त्या अळीने कात टाकली होती. सकाळी उठून पाहण्यासाठी गेलो तेव्हा कात टाकून नव्या रूपात ती सजली होती. शरीरावर मध्यभागी तसेच डोके व शेपटी जवळ असे तीन फिकट पांढरे पट्टे दिसत होते. पानावर शेजारीच जुनी कात चिकटून होती. अंघोळ करून हापिसात जायला निघालो तेव्हा जुनी कात खाण्यात ती व्यस्त झाली होती.
![]() |
कात टाकलेली अळी |
दिवस आठवा, २८ फेब्रुवारी २०१८ - कोवळ्या पानांच्या कडा कुरतडल्या जात होत्या, हलकेच कुरुम कुरुम आवाज येत होता. दिवसेंदिवस कमालीच्या वेगाने ती खात होती, वाढत होती. आज १५ मिलीमीटर पर्यंत तिची वाढ झाली होती.

दिवस नववा, १ मार्च २०१८ - आज अळी १७ ते १८ मिलीमीटर पर्यंत वाढली होती. त्वचेवरील केस / काटे थोडे कमी झाले होते.
दिवस दहावा, २ मार्च २०१८ - रोज अंदाजे २ मिलीमीटरने वाढणारी अळी आज २० ते २१ मिलीमीटर लांबीची झाली होती. तिचा त्वचेचा तपकिरी रंग बदलून शेवाळी हिरवा झाला होता. पांढरे डाग गडद दिसू लागले होते. निरीक्षण करताना तिला चुकून हात लागला तर तिने लगेच डोक्यावरून गडद लाल रंगाची सोंड बाहेर काढली. धोका जाणवला की शत्रूला चकित करण्यासाठी अथवा घाबरवण्यासाठी हि युक्ती आहे.
![]() |
शत्रू ला घाबरवण्यासाठी अळी असे आक्रमक रूप धारण करते व भडक लाल रंगाची सोंड बाहेर काढते |
दिवस अकरावा, ३ मार्च २०१८ - अकराव्या दिवशी त्या अळीची लांबी २५ मिलीमीटर असून, डोक्याकडचा भाग ६ ते ७ मिलीमीटर जाडीचा तर शेपटाजवळ चा भाग ४ मिलीमीटर जाडीचा होता. त्वचेवरील पांढरे डाग जाड व जास्त गडद दिसत होते. स्वतःच्या संरक्षणाकरिता ह्या अळीचा रंग पक्ष्याच्या विष्ठेसारखा दिसतो त्यामुळे पक्षी, पाल, सरडा इत्यादी त्या अळीकडे भक्ष्य समजून आकृष्ट होत नाही व त्यांच्यापासून अळीचे संरक्षण होते.
![]() |
शत्रूला चकवण्यासाठी पक्ष्याच्या विष्ठेसदृश रंग |
दिवस बारावा, ४ मार्च २०१८ - बाराव्या दिवशी सकाळीच त्या अळीने कात टाकून स्वतःचे रूप पालटले होते. शेवाळी हिरव्या - तपकिरी रंगाची त्वचा आता पोपटी हिरव्या रंगाची झाली होती, मोठे काळेभोर डोळे व त्यांना जोडणारी नक्षीदार पिवळसर रेघ व पोटाजवळचे तपकिरी रंगाचे पट्टे फार सुंदर दिसत होते. हे मोठाले डोळे खरेखुरे डोळे नसून शत्रूला घाबरवण्यासाठी व स्वतःच्या संरक्षणासाठी आहेत. लांबी २८ ते ३० मिलीमीटर, डोक्याजवळील भाग ८ मिलीमीटर जाड तर शेपटाकडील भाग ४ मिलीमीटर जाडीचा झाला होता. खादाडी बरीच वाढली होती.

फुलपाखराच्या अळ्या जसजश्या मोठ्या होत होत्या, मनात भीती वाढत होती. पूर्वानुभवाने माहीत होते की अळ्या मोठ्या झाल्या की पक्षांच्या नजरेस येतात आणि खाल्ल्या जातात. त्यामुळे दोन्ही कुंड्या मी घरात आणून ठेवल्या होत्या. रोज त्या अळ्यांचे निरीक्षण करायचो, लिहून ठेवायचो. कडीपत्ताच्या एका झाडावर चार आणि दुसऱ्यावर दोन अळ्या होत्या. त्यापैकी पाच जवळपास १२ दिवसाच्या असून छान हिरव्यागार झाल्या होत्या. नुसती खादाडी सुरू असायची आणि जागोजागी विष्ठेचे गडद हिरव्या - काळ्या रंगाचे टपोरे दाणे विखुरलेले असायचे. दोन चार दिवसातच त्यांचे कोषात रूपांतर होणार होते. दिवसातून पाच सहा वेळा झाडून घेऊन आई कंटाळायची.
दिवस तेरावा, ५ मार्च २०१८ - अळीचा सुंदर हिरवा रंग आज जास्त गडद झाला होता. जेव्हडी जास्त पाने खाईल तेव्हडी अळीची वाढ होत जाते. कडीपत्ता ची फांदी उघडी बोडकी दिसू लागली होती. जमिनीवर तिच्या विष्ठेचे हिरवे दाणे इतस्ततः विखुरलेले असायचे. तेराव्या दिवशी तिची लांबी ३८ मिलीमीटर, डोक्याची जाडी १० मिलीमीटर तर शेपटीकडची जाडी ५ मिलीमीटर झाली होती.
![]() |
पाने खाऊन धष्टपुष्ट झालेली अळी |
दिवस चौदावा, ६ मार्च २०१८ - फुलपाखराची अळी आता खूप जास्त खायला लागली होती. दिवसेंदिवस तिची भूक वाढली होती. विष्ठेचे दाणे इतस्ततः पडलेले असायचे. जेव्हडी जास्त खादाडी तेव्हडी जास्त विष्ठा. रोज जवळपास २ मिलीमीटर ने वाढणारी अळी आता रोज ६ ते ७ मिलीमीटर ने वाढत होती. तिच्या शरीरावरील ७ व डोक्याजवळील २ असे एकूण ९ वेगवेगळे भाग व्यवस्थित दिसत होते. आज तिचे शरीर ४३ मिलीमीटर लांब, डोक्याजवळ १० मिलीमीटर जाड तर शेपटाकडे ५ मिलीमीटर जाड झाले होते.
पाने खाताना चा विडिओ येथे पहा -
पाने खाताना चा विडिओ येथे पहा -
रात्री हापिसातून घरी आल्यावर कॅमेरा ने त्यांचे फोटो काढले आणि पाने खाताना चा एक व्हिडिओ बनवला. लांबी, रुंदी, जाडी, रंगातील फरक वगैरे नमूद केले. चार पैकी दोघे एकाच फांदीवर पाने खाऊन समोरासमोर सुस्त बसून होते. कधीतरी त्यांना एकमेकांना ओलांडून पुढे जावे लागणारच होते आणि त्यात त्यांचा झगडा पक्का होता. झगडा होताना त्या डोक्याने एकमेकांना ढूश्या देतात. रात्री उशिरापर्यंत असे काही झाले नाही. सकाळी उठून नेहमीच्या कुतूहलाने झाडांजवळ गेलो, चार पैकी एक अळी दिसली नाही. बाकीच्या तीन अळ्या खादाडी करण्यात मग्न होत्या. इथेतिथे शोधताना जीव कासावीस होत होता. कुणा पक्ष्याने खाण्याचा संभव नव्हताच. नक्कीच झगडा झाला असणार आणि एक झाडावरून खाली पडली असणार. भिंतीवर कुंडीपासून जवळपास एक मीटर अंतरावर, भिंतीवर विष्ठेचे डाग दिसले. कोष बनवताना अळी तिच्या पोटातून सगळी घाण बाहेर काढते आणि शरीरातील चिकट द्रव्यापासून बनवलेल्या दोरीने स्वतःला कुठल्याश्या फांदीवर अडकवून घेते. खूप शोधाशोध केली, आजूबाजूचे सगळे फर्निचर हलवले, अर्धा पाऊण तास कुंडीजवळचा कोपरा न कोपरा धुंढाळला पण सापडली नाही.

दिवस पंधरावा, ७ मार्च २०१८ - फुलपाखराची अळी खूप खादाडी करून जास्तीत जास्त वाढली होती. ती आता कोष बनण्यास उत्सुक झाली होती. ती आता कोष बनवण्यास इथे तिथे फिरत होती. बहुतेक काल अचानक गायब झालेली अळी अशीच योग्य जागेच्या शोधात कुठेतरी अडगळीच्या जागी निघून गेली असावी आणि पालीच्या भक्ष्यस्थानी पडली असावी. ह्या हिरव्या अळीने स्वतःला कोष बनवण्यासाठी एक योग्य जागा शोधली आणि तेथे स्वतःच्या तोंडातून काढलेल्या रेशीम सदृश तंतू ने फांदीला लटकवून घेतले. ती आता थोडी आकुंचन पावू लागली होती आणि त्यामुळे चमकदार हिरवा रंग आता फिकट वाटू लागला होता. कालच्या ४३ मिलीमीटर लांबीवरून आज तिची लांबी २२ मिलीमीटर झाली होती. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिने स्वतःचे हिरव्या कोषात रूपांतर केले. तब्बल ६ मिनिटे तिचा स्वतःशी संघर्ष सुरु होता. ती आता अंतर्बाह्य बदलली होती. थोड्याच वेळात अजून एका अळीने देखील कोष बनवला. परंतु त्यास तिने पंधरा नाही तर अठरा दिवस घेतले. इतर दोन अळ्या देखील मोठ्या आणि हिरव्या झाल्या होत्या.
![]() |
कोष बनण्यापूर्वी आकुंचन पावलेली अळी |
![]() |
अळीचा झाला कोष |
दिवस सोळावा, ८ मार्च २०१८ - आता दोन फुलपाखराच्या अळ्यांचे कोष होते तर इतर दोन अळ्यांनी सुद्धा स्वतःला झाडाच्या फांदीला लटकवून घेतले. रात्री त्या दोघांनी कात टाकून कोषात रूपांतर केले. आदल्या दिवशी झालेले कोष गडद हिरव्या रंगाचे व चकाकदार झाले.
फुलपाखराच्या अळीचा कात टाकून कोषात रूपांतर होतानाच व्हिडिओ येथे पहा -
आपल्याला शरीरावर कुठेही खरचटले आणि थोडीशी त्वचा निघाली तर किती जळजळ होते. परंतु काही प्राणी जसे साप आणि कीटक जेव्हा कात टाकतात व नवीन रूप धारण करतात तेव्हा त्यांच्यासाठी ते खरेच सोप्पे असेल का त्यांना देखील आपल्यासारखाच त्रास होत असेल? ते त्यांच्या भावना व्यक्त करीत असतील का निमूट सहन करीत असतील?
![]() |
दिवस तेवीसावा, १५ मार्च २०१८ - एकूण ४ कोषांपैकी एक, ज्याचे आपण वर निरीक्षण लिहिले आहे तो थोडा काळसर व्हायला लागला. कॉमन मॉरमॉन फुलपाखरू काळ्या रंगाचे असते. तो त्याचा पंखांचा काळसर रंग कोषात दिसू लागला होता. इतर दोन कोष अजून हिरवे दिसत होते.
![]() |
कोषातून फुलपाखरू बाहेर येण्याची वेळ आली कि कोषाचा रंग बदलतो. |
दिवस चोविसावा, १६ मार्च २०१८ - आणि अखेर ज्याची आतुरतेने वाट पहिली तो क्षण आलाच. सकाळी उठल्यापासून मी झाडाजवळ जाऊन बसलो होतो. सकाळी ८ वाजून पंधरा मिनिटांनी कोषात हालचाल जाणवली. काळ्याकुट्ट कोषाचा पारदर्शक पापुद्रा हळू हळू विलग होऊ लागला. फुलपाखरू कोष तोडून बाहेर आले आणि थोडेसे विसावले. त्याचे पंख दुमडलेले होते, ओले होते. पाण्यासारखा द्रव त्या कोषात दिसून येत होता. पंखात रक्ताभिसरण सुरु झाले, पंख पूर्णपणे उघडले आणि थोड्या वेळाने तो नाजूक सुंदर जीव उडायला लागला.
दिवस पंचविसावा, १७ मार्च २०१८ - दुसऱ्या कोषातून पहाटे ५ वाजताच फुलपाखरू बाहेर आले.
'अंडे - अळी - कोष - फुलपाखरू' अशी जीवनप्रणाली पूर्ण होण्यास एका अळीला चोवीस तर दुसऱ्या अळीला सत्तावीस दिवस लागले. अश्याप्रकारे हि अंड्यातून अळी, कोष व फुलपाखरु होण्याची प्रक्रिया साधारण २५ ते ३० दिवसात पूर्ण होते.
फुलपाखराचे जीवन मुख्यतः चार भागात विभागता येते - १. अंडे, २. अळी, ३. कोष, ४. फुलपाखरू.
आपल्याकडे जेव्हडी अधिक जैव विविधता असेल तेव्हडी जास्त फुलपाखरे आपल्या सभोवताली दिसतात. याचे कारण म्हणजे प्रत्येक फुलपाखरू एक विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीवर अंडी घालतात आणि त्याच वनस्पती ची पाने खाऊन अंड्यातून निघालेली अळी स्वतःची गुजराण करते. वेगवेगळ्या जातीच्या फुलपाखरांची अंडी वेगवेगळ्या आकारांची आणि रंगाची असतात. मुखतः पिवळ्या, नारिंगी, हिरव्या अथवा पांढऱ्या रंगछटेची ही अंडी गोल चेंडूसारखी, लांबट बाटलीसारखी, पसरट बशी सारखी वगैरे असतात. शक्यतो अंडी कोवळ्या पानांवर घातली जातात.
![]() |
शिकाऱ्याला फसवणारे खोटे डोळे
|
अंड्यातून छोटीशी अळी बाहेर आल्यावर नुसती खादाडी करत सुटते. सगळ्यात आधी ती स्वतःचे अंडे खायला लागते आणि मग झाडाच्या कोवळ्या पानांकडे आपला मोर्चा वळवते. पानाचा थोडा भाग खाल्ला की एक झोप काढायची आणि मग पुन्हा खादाडी सुरु.
जेवायचे, झोपायचे आणि शी करायचे एव्हढाच काय तो उद्योग. आणि हा उद्योग दिवस रात्र सुरु असतो. जसजसे खाईल तसतसे तिची वाढ सुरू असते. पहिल्या दिवशी फक्त २ मिलिमीटर लांबी असलेली अळी केवळ १० दिवसात ४० मिलिमीटर पर्यंत वाढते. इतक्या विलक्षण गतीने शरीराची वाढ होत असताना ती अळी कात टाकत असते, स्वतःचा रंग, आकार, रूप बदलत असते. इंग्रजीत त्याला INSTAR असे म्हणतात. फक्त अळी असतानाच चार ते पाच वेगवेगळी रूपे असतात. प्रत्येक वेळेस कात टाकायच्या आधी ती निद्रावस्थेत जाते. काही वेळ काहीच न खाता ती निपचित पडून असते. कात टाकली कि तिचा रंग बदलतो. पुन्हा खादाडी सुरु. अळीतून कोषात रूपांतर होतानाच्या प्रक्रियेत तर ती अंतर्बाह्य बदलून जाते. त्यावेळेस तिची खादाड अवस्था संपलेली असते. आपल्या पोटातील सगळी घाण काढून टाकून ती स्वतःचं शरीर आकुंचित करते व रेशीम सदृश्य दोरीने स्वतःला झाडाच्या फांदीला अडकवून घेते. कात टाकताना तिची ज्या प्रकारे धडपड सुरू असते ते बघताना तिचा त्रास आपल्याला जाणवतोच. त्याचवेळेस या बदललेल्या रुपबद्दल कुतूहल देखील निर्माण होतं. कोषात रूपांतर झाल्यावर पुढील दहा दिवसांत त्यास पंख, सोंड येऊन त्याचे फुलपाखरू होतानाच्या निद्रावस्थेत त्याच्या शरीरात अगणित बदल घडत असतील. ती नेमकी प्रक्रिया या चिकित्सक मनुष्याला कधीतरी कळेल काय?
निसर्ग हा अनेक रोचक घटकांनी बनलेला आहे. केवळ झाडाझुडुपांच्या हिरव्या रंगातच कित्येक छटा आहेत. फुलपाखरांवर ज्या प्रमाणे रंगांची मुक्तहस्ते उधळण केलेली आढळते त्याचप्रमाणे त्यांच्या अनेक गूढरम्य गोष्टी देखील मानवाच्या आवाक्याबाहेर आहेत. मनुष्यातील उपजत कुतूहल आणि निरीक्षण शक्ती पणाला लावून देखील अनेक गोष्टींची उकल आपल्याला होऊ शकत नाही हेच खरे.
![]() |
कॉमन मॉरमॉन जातीच्या फुलपाखराच्या नर आणि मादी मधील फरक |
- समीर पटेल
अतिशय छान लेख समीर 👌👌
ReplyDeleteThank You Pranav
Deleteअत्यंत आकर्षकपणे रेखाटला आहेस फुलपाखराचा जन्म. जोडीला उत्तम छायाचित्रे. आणि महत्वाची माहिती. मस्त.
ReplyDeleteधन्यवाद विजय काका.
Deleteसुंदर लेख.ह्या आल्या/अंडी आधी माझ्या घरातल्या कुंडी मध्ये बघितल्या होत्या पण त्या इतक्या सुंदर फुलपाखराच्या असतात ते आज तुमच्यामूले कलाले.
ReplyDeleteधन्यवाद
एकच नंबर मित्रा... शब्दांसहित चित्रांची जोडी पाहताना सुंदर अनुभव मिळाला..
ReplyDeleteधन्यवाद
Deleteएकच नंबर मित्रा... शब्दांसहित चित्रांची जोडी पाहताना सुंदर अनुभव मिळाला..
ReplyDeleteBeautiful photos as well as article 👌
ReplyDeleteThank you very much
Delete१ नंबर समीर. तुझ हे काम खुपच छान आहे. तु किती मेहनत घेतली आहेस ह्या वरून समजते.
ReplyDeleteधन्यवाद -^-
DeleteToo good
ReplyDeleteWell written article, beautiful photography.Try to publish in magazine.
ReplyDeleteSamir very nice. Salute to your efforts.
ReplyDeleteThank You Sharad ji.
Deleteसमीरजी
ReplyDeleteफोटो आणि वर्णन अतिशय उत्तम आहे. सातत्याने केलेला प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. अनेक शुभेच्छा
खूप धन्यवाद
Deletemastach
ReplyDeleteसमीर,
ReplyDeleteछायाचित्र , निरीक्षण आणि वर्णन अप्रतिम.