Pages

Tuesday, 17 April 2012

पदरगडाची चढाई


शनिवार - रविवार कुठे जायचे हा नेहमीचा प्रश्न. उकल होतेच शुक्रवार पर्यंत. अक्खा हिवाळा वाया गेला होता अन आता भर उन्हाळ्यात ट्रेक चे वेध लागले होते. नवीन करावे काहीतरी, नवीन पाहावे काहीतरी. बेत काहीच आखला नव्हता आणि आखलेला डब्यात टाकला होता कारण हेमंत चा साखरपुडा होता शनिवारी, १० एप्रिल २०१२. त्याला टांग देणे चालण्यासारखे नव्हते. बाकी कुणी ट्रेक साठी येईल असं वाटत नव्हतं. मंदार कडे मन मोकळा केलं, पदरगड करणार का म्हणून विचारले. कोण कोण?? तर मी आणि तू एव्हडंच उत्तर दिलं मी. साखरपुडा उरकला कि मग हेमंत कडेच डोंबिवली ला मुक्काम करायचा, त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारायच्या अन दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटेच निघायचं ठरलं. कर्जत ला जाऊन मग पुढे जे मिळेल त्या वाहनाने सुटायचं पदरगडावर झेप घ्यायला. रात्री हेमंत कडे जाताना पिनाक बाईक वर सोडायला आला होता. गप्पा मारता मारता डोस्क्यात कल्पना शिरली - पिनाक ला बकरा बनवायची. मंदार ला इशारा केला अन पिंक्या ला सांगितले कि बाईक ठेवून जा कल्याण ला, आम्ही सकाळी तुझी बाईक घेऊन जाउत, संध्याकाळी घरी आणून देऊ, तेव्हडाच आमचा वेळ वाचेल. नाही नाही करत विविध करणे देत पिंक्या ने कलटी मारली. हेमंत चा साखरपुडा म्हणजे तो दिवस शुभ असणारच. ५ मिनिटात पिंक्या पुन्हा दारात उभा. म्हणे - "घेऊन जा रे बाईक माझी. व्यवस्थित ट्रेक करा. माझ्या जिवलग मित्रांनी माझ्याकडे पहिल्यांदा काही मागितलं तर मला कसातरीच झालं नाही म्हणायला. मी माझा दुसरा बंदोबस्त करतो." सूर्यप्रकाशात काजवा चमकावा तसा झालं. तडाक उडालोच तिघेही. काना - डोळा कशावरच विश्वास बसू नये असे ते शब्द. हाच काय तो आपला पिंक्या?? एव्हडा कसा काय बदलला?? आला तसा तडक निघूनही गेला. बाईक ची सोय मात्र करून गेला. 

रविवारी सकाळी लवकर उठलो, शौच आटोपून, तोंड धुवून लागलीच निघालो. अंघोळीची वगैरे भानगड नाही. रस्ता थोडाफार ऐकून माहित होता. डोंबिवली - पनवेल - चौक - कर्जत करीत निघालो. कर्जत स्टेशन ला न्याहारी आटोपली, पुन्हा पुढे. कर्जत ते कशेळे फाटा अन मग खांडस. हे पायथ्याचे गाव. भीमाशंकर चा प्रचंड कडा समोर उभा थकलेला. मुसळधार पावसात शिडी घाटातून केलेल्या थरारक ट्रेक ची याद देऊन गेला. गणेश घाट सुरु होतो तेथेच झाडाखाली बाईक पार्क केली. पुरेसे पाणी, जेवण सोबत घेतले होतेच. येथे पोहोचे पर्यंत १० वाजले होते.

चार पाउले पुढे टाकली तोच २ रस्ते. कुठला घ्यायचा या विचारात न पडता, 'Pinak is Always Right' अस म्हणत उजवी पायवाट घेतली. उन्हाचे चटके आता पासूनच जाणवू लागले होते. पण डेरेदार आंब्याखाली आलो अन मनात एकदम उर्मी आली. समोरच झाडावर बसलेला सुतारपक्षी (Black Rumped Flame back Wood Pecker) दिसला. आमच्या पावलांच्या आवाजाने त्याने लगेच झुडुपात मुसंडी मारली. दुसऱ्या एका झाडावर पल्लवपुच्च्छ कोतवाल (Racket Tailed Drongo). त्या सोबत नजरा नजर झाली, कॅमेरा कडे हात जाताच भैया ने भरारी मारली. पुढे गेलो तोच अजून एक... दुसरा पण...तिसरा...कित्ती सारे. जणू आमची चाहूल लागली सगळ्यांना आणि नुसता किलबिलाट सुरु झाला. लाल तोंडाच्या पोपटांचा एक थवा उडून गेला. नाना तऱ्हेचे पक्षी पहिले.
गणेश घाट संपताच दिसणारा पाठमोरा पदरगड. 
नुकतीच कुठे सुरुवात झाली होती. अजून बराच पल्ला गाठायचा होता. मंदार थोडासा पुढे गेला पण वाट भलतीकडेच जात असल्याचं जाणवू लागलं. गणेश घाटाचा रस्ता हा नव्हतं. पुन्हा मागे फिरणं आमच्या म्हणजे आमच्या स्वाभिमानाला ठेच असल्यागत आम्ही डोंगरावरच आडवे चालू लागलो. २ मिनिटात पाउलवाटेला मिळालो. सुरुवातीचा उभा चढ आणि त्यात पानगळ झाल्यामुळे सावलीचा पत्ता नाही. गणेश मंदिरा पर्यंत पोहोचे पर्यंतच आमची हवा टाईट झाली. स्वतःबद्दल कसेसेच वाटले. एकतर खूप दिवसांनी ट्रेक केला होता त्यात उन्हाने अंगाची लाही लाही होत होती. ५ मिनिटे निवांत बसलो. देवळात बसून बाटलीभर पाणी संपवले दोघांनी. पुढची वाट निवांत चालायला घेतली. बाईक आणली असल्या कारणाने सार्वजनिक वाहनाच्या वेळा पाळणे बंधन कारक नव्हते. घाट चढून पठारावर आलो, पदरगड दिसू लागला होता. असंच त्याच्या कडे तोंड करून चालायचा होता. मध्ये मध्ये खारूताईंनी, वानरांनी दर्शन दिलं. आता जंगले सोडून नुसतं  उघडं बोडकं पठार होतं, काळा कातळ तापला होता, पण आमची वाटचाल सुरूच होती. डावीकडे शिडी चा घाट दिसू लागला.

विहिरीच्या डावीकडून जंगलात जाणारी वाट घ्यायची. 
 इथेच उजवीकडे एक विहीर आहे. त्याच्या शेजारूनच जंगलात जाणाऱ्या वाटेने जायचे होते. विहिरीत थोडेसेच पाणी होते. आजूबाजूला अखंड कचरा. खाली उतरून मंदारने विहिरीत पडलेले प्लास्टिक बाजूला काढले, एका रिकाम्या बाटली मध्ये ते हिरवे गढूळ पाणी भरून घेतले, अगदीच गरज भासलीच तर वापरता येईल म्हणून. आता आम्ही दाट जंगलात प्रवेश केला होता. पांढरे बाण जागोजागी दिशादर्शक ठरत होते. यातला एक जरी बाण चुकला तरी आम्ही हरवायची भीती होती. इथे मात्र दाट झाडी. उंच उंच वृक्षांच्या छायेतून जाताना नजर मात्र 'शेकरू' कुठे दिसतंय का तेच शोधीत होती. इथे नक्कीच काहीतरी वेगळं पाहायला मिळणार हि अशा लगेचच खरी ठरली. वाळलेल्या पाचोळ्यावरून आवाज होऊ न देण्याची काळजी घेत चालताना शेजारी कुणीतरी असल्याची चाहूल लागली. कुणीतरी आपल्याच धुंदीत पाचोळा उडवीत होतं. जणू आमची दखलच नाही. मंदार ला हळुवार येण्याची खूण केली अन मी दगडांवर पाय ठेवीत, पाचोळ्याचा आवाज येणार नाही याची खबरदारी घेत सावकाश पुढे पुढे सरकत होतो. दिसलं.... काहीतरी दिसलं ... माझ्या कडेच पहातंय... रानकोम्बडा. टकामका बघत राहिला... आणि पळाला. मी पुढे सरसावलो. तेव्हड्यात अजून काहीतरी पळालं. नक्की काय ते दिसलं नाही पण एक...दोन...तिसऱ्या आणि चौथ्याने चक्क भरारी मारली. फडफडत दोघेही झुडुपात गडप झाले. भाग्यवंत आम्ही. नुसतंच गोष्टींमध्ये ऐकलेलं रान आम्ही आज अनुभवत होतो.
खिंडीकडे जाणारा घासार्र्याचा मार्ग.
पांढरे बाण शोधत शोधात आम्ही निघालो खिंडी च्या दिशेने. वाटेत एका झाडावर मोठा बाण कोरला होता. हा शेवटचा संकेत. येथून पुढे खडी चढण, घासाऱ्याची. सांभाळून चढलो. पुढे एक कातळकडा. तो चढून जायची खूण होती पण ती न घेता शेजारची निमुळती पायवाट घेतली. ती एव्हडी निमुळती होती एका ठिकाणी कि पाय ठेवायलाच जागा नाही. कसे बसे तो टप्पा मी पार केला पण मंदारची उंची माझ्यापेक्षा कमी त्यामुळे त्याला तेथे लांब पाय टाकायला बराच त्रास झाला. येथून थोडासा पाय घसरला, तरी कपाळमोक्ष होणार. पण निभावला एकदाचा आणि पुढे घळीतून अजून मोठी उभी चढाई होती. पोहोचलो आम्ही चिमणी कडे.

चिमणी कडे जायची चिंचोळी वाट.
हि चिमणी म्हणजे चिऊताई नव्हे तर दोन कातळा मधली चिंचोळी जागा. जेमतेम एक माणूस जाईल एव्हडीच. त्यात शिरण्यासाठी एक मोठा दगड चढायचा. पाठीवरची थैली पण त्या चिंचोळ्या जागेत आम्हाला अडकवत होती. आधी मंदार आणि मागे मी, पंधरा फुटांचा तो टप्पा चढून गेलो. मंदार ला हसताना एका ठिकाणी माझी पण फसगत झाली होती. खालच्या खिंडीत पोहोचलो होतो तिथून पुढे उजवीकडे अजून एक कातळ कडा चढायचा होता. सोबतीला दोर आणला होताच पण त्याचा वापर न करण्याचे ठरवले. खाज होती ना अंगात. पुढे मी आणि मागे मंदार. तसा जास्त अवघड नाहीये कडा पण तेथून खाली खोल दरी आहे एका अंगाला. त्यामुळे तोल सावरत व्यवस्थित चढावे लागते. तो कातळ टप्पा पार करून आणि पुढे थोडासा वळसा मारून पोहोचलो गुहेपाशी. अंग टेकवलं, पाणी प्यायलो, दाबली गेलेली केळी पोटात ढकलली, सभोवतालचा नजारा साठवला डोळ्यात, कड्यावरच्या झाडावर ससाण्याने दर्शन दिले, आणि पुढच्या दहा पंधरा मिनिटात आम्ही निघालो. आता अजून एका खिंडीत चढायचं होतं. इथे दगडात सुंदर पायऱ्या खोदून काढल्या आहेत. खिंडीत पोहोचलो की त्या पायऱ्या वळून आपल्याला उजवीकडे गडाच्या माथ्यावर घेऊन जातात. डावीकडच्या टोकावर जाण्याची वाट नाही.

गडमाथ्यावर जाताना लागणाऱ्या कातळ कोरीव पायऱ्या.
 माथ्यावर आल्याक्षणीच आपले लक्ष वेधून घेतात ते समोर उभे थकलेले दोन सुळके, पलीकडे भीमाशंकर चा उत्तुंग कडा, त्याचे उच्चतम टोक - नागफणी, दूरवर दिसणारा सिद्धगड आणि खालच्या पठारावर पसरलेले हिरवे रान.
गडाच्या माथ्यावर घरांची काही जोती, सुकलेली पाण्याची नऊ - दहा टाकी आणि सुळक्याच्या पोटात खोदलेली एक गुहा या खेरीज काही नाही. एकाही टाक्यात पाणी नाही. पावसाळ्यात यातील किमान दोन टाकी तरी पाण्याने भरलेली असावीत. बाकीची मातीने भरलेली, दगड पासून बुजलेली. या सुळक्यांवर काही ठिकाणी मेखा मारलेल्या आहेत. चढाई करायची असेल तर प्रस्तरारोहणाचे प्रशिक्षण आणि साधने महत्वाची. सभोवताली नजर फिरवून आम्ही परतीच्या वाटेला लागलो.
Add caption
चिमणी पर्यंत यायला १० - १५ मिनिटे लागली. पुढे मातीचा घसारा सावकाश आणि सावधानतेने उतरलो. जंगलात शिरून पठारावर आलो. पुन्हा एकदा पदर गडावर नजर फिरवली, आम्ही कुठून कसे वर चढलो तो मार्ग पहिला आणि तडक गणेश घाटाच्या वाटेला लागलो. घाट उतरून डांबरी रस्त्यावरून दोन ते अडीच किलोमीटर खांडस गावात चालत जायचे म्हणजे जीव मेटाकुटीला येतो.   आमच्याकडे बाईक असल्या मुळे ती दमछाक वाचणार होती. बाईक सुरु केली, गावात पोहोचलो, गावातल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी बायकांची गर्दी होती. पोहोरं मागितलं,पाणी काढलं आणि डोक्यावर टाकलं. तापलेल्या जीवाला काय वाटलं ते शब्दात सांगता येणार नाही. ओल्या ओल्याच बाईक वर बसताना उन्हातल्या भटकंतीचा सगळा शीण निघून गेला होता. खांडस - कशेळे - मुरबाड रस्ता पार करीत असताना काही ठिकाणी फार वाईट रस्ता लागला आणि घाई घाई करता खड्ड्यांशी हातमिळवणी झाली. पंक्चर झालेली बाईक एक किलोमीटर पर्यंत धक्का मारत ढकलली, पंक्चर काढले आणि मग मुरबाड गाठल्यावर पुढे गाडी सुसाट पळवली. तरीही कल्याण ला पोहोचायला बराच उशीर झाला. पिनाक कडे बाईक सोपवली आणि खूप उशीरा बोरीवली ला घरी पोहोचलो. भीमाशंकर च्या प्रत्येक खेपेला शेजारी उभा राहून साद घालणारा कुक्कर च्या शिट्टी सारखा कलावंतीणीचा महाल उर्फ पदर गड आज सर केला होता. पुढची चढाई पाउस सरल्यावर सगळ्या भटक्या मित्रांना घेऊनच करायची व सगळ्यांना ह्याच्या चिमणी-चढाई चा आनंद उपभोगू द्यायचा हा निश्चय केला आणि नवीन अनुभव गाठीशी बांधून गाढ निद्राधीन झालो.

गडावरील सुकलेले पाण्याचे टाके. 
कुक्कर च्या शिट्टी सारखा दिसणारा पदरगड उर्फ कलावंतीणीचा महाल
खांडस गावातून दिसणारा पदरगड.


        


3 comments:

  1. ashya kya sundar lihilays... I loved it....

    ReplyDelete
  2. khup bhari, I enjoyed reading. Photos are very vivid. Thanks for sharing

    ReplyDelete