Pages

Monday, 5 November 2012

बाजीराव पेशवा जन्मस्थळडूबेर गडाचा पायथा म्हणजे डुबेरे गाव. या गावात 'बर्वे वाडा' नावाचा एक सुमारे ३०० वर्षांपूर्वीचा वाडा आहे. अजूनही सुस्थितीत असलेला, २ बुरुजांचा अन ६ फुट जाड तट भिंतीचा हा वाडा म्हणजे मल्हार दाजी बर्वे यांचा वाडा. हे मल्हार म्हणजे राधाबाईंचे सख्खे बंधू. याच वाड्यात सन १७००, भाद्रपद महिन्यात राधाबाईंच्या पोटी पेशवे बाजीराव पहिले यांचा जन्म झाला.


फार पूर्वीचे अनेक डोंगरांच्या मध्ये वसलेले अन गवताने व्यापलेले हे गाव. दुरून दृष्टीस न पडणारे अन गवतात डूबलेले म्हणून हे  डुबेरे गाव अशी कथा आजी बाईंनी सांगितली. सन १६७९ मध्ये साल्हेर सालोटा च्या लढाई नंतर छत्रपती श्री शिवाजी राजे पुण्यास परतत असताना संगमनेर जवळ मोगल सरदाराने वाट अडविली. त्यामुळे बहिर्जी नाईक यांनी शिवाजी राजांना लपत छपत या डुबेरे गावात आणले. एक दिवस येथे एका झोपडी मध्ये मुक्काम करून राजे २२ नोव्हेंबर १६७९ रोजी विश्रामगडावर / पट्टा गडावर १० दिवसांच्या मुक्कामासाठी गेले.

हे मल्हार उदरनिर्वाहा साठी या भागात आले होते. तारा राणींच्या कारकिर्दीत भोसले घराण्याने बर्वे घराण्यास येथील जमीन इनाम म्हणून दिली. सोबत बर्वे घराण्यास गाई बैलांची मोठ्या प्रमाणावर पैदास करून चांगल्या प्रतीचे बैल तोफांचे गाडे हाकण्याच्या कामी पाठवण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी दिली. या भागात मोठ्या प्रमाणावर गावात वाढत असे त्यामुळे कुरणा साठी हि जागा योग्य होती.
राधाबाईंचे माहेर कोकणात परंतु त्या गरोदर असताना (भाद्रपद) पावसाळ्याचे दिवस होते. अश्या वेळेस त्यांना माहेरी कोकणात पाठवण्याऐवजी त्यांचे बंधू जे घाटावर राहत, यांच्या घरी प्रसूती साठी पाठवण्यात आले. याच राधाबाईंच्या पोटी पेशवे बाजीराव पहिले यांचा जन्म झाला. वाड्यातील ती खोली अन पलंग अजूनही सुस्थितीत आहेत.

सध्या वाड्यात श्री जयंत बर्वे व सौ विजया बर्वे यांचा निवास आहे. बर्वे घराण्याची ही अकरावी पिढी. बाजीरावाची जन्म कथा व इतिहास ते मोठ्या कुतूहलाने सांगतात. त्यांचे चिरंजीव शेखर हे कामानिमित्त सिन्नर येथे निवासाला असतात. वाड्यातील बहुतेक गोष्टी पुरातन असून अजूनही सुस्थितीत आणि ४०० वर्षानंतर देखील वापरात आहेत. लाकडी खाम्बांवारचे नक्षीकाम कार सुरेख आहे. भिंतींमध्ये धान्य साठवण्याच्या तसेच मौल्यवान वस्तू लपवण्याच्या जागा आहेत. वाड्यात एक आड (विहीर) असून त्या शेजारीच घोड्यांची पागा असायची. वाड्यात काही वर्षांपूर्वी गावातील शाळा भरत असे. मुलांनी कुतूहलाने टाकलेल्या काही दगडांमुळे आडातील झरे बंद झाले अन आड ओस पडली.

 वाड्या शेजारीच सटूवाई देवीचे मंदिर आहे. बर्वे घराण्यातील एका पिढीला मुल बाल होत नव्हते अश्या वेळेस सटूवाई ने स्वप्नात दृष्टांत दिला व हे मंदिर उभारण्यास सांगितले. महाराष्ट्र मध्ये केवळ ३ ठिकाणी सटूवाई मूर्ती स्वरुपात असून त्यापैकी हे एक आहे.
या म्हाळोजी ना चार ठिकाणची इनामकी मिळाली होती. पिंपळास, कोतूर व पांढूरे या ठिकाणी अशाच प्रकारचे वाडे आहेत.

वाड्यातून समोरच छोटेखानी डूबेरगड दिसतो. डूबेरगड चढण्यासाठी २५ ते ३० मिनिटे पुरेशी होतात. पायथ्याशी एक आश्रम असून तेथे किसन नाना पानसरे नावाचे साधू राहतात. पायथ्याच्या शिवमंदिरात निवासाची सोय होऊ शकते. जवळच स्वच्छ पाण्याची एक विहीर आहे. गडावर सप्तशृंगी देवीचे मंदिर असून वर जाण्यास पायर्या बांधल्या आहेत. जवळपास पाचशे पायऱ्या चढून आपण डोंगराच्या माथ्यावर पोहोचतो. दोन खडकात खोडलेली पाण्याची टाकी, एक छोटा तलाव व हे मंदिर या पलीकडे वर पाहण्यासारखे काही नाही. केवळ टेहळणी करीता या किल्ल्याचा वापर होत असावा. गड चढून, फिरून पुन्हा खाली येण्यास दीड तास पुरतो.


डुबेरे गावात जाण्यासाठी मुंबई हून घोटी मार्गे सिन्नर कडे जायचे. सिन्नर च्या थोडं अलीकडे उजवी कडे जाणाऱ्या फाट्यावरून १३ किलोमिटर आत डुबेरे गाव आहे.
अधिक छायाचित्रांसाठी वेबसाईट पहा - https://picasaweb.google.com/112424448078863794767/BirthPlaceOfBajiraoPeshwa

No comments:

Post a Comment