Pages

Tuesday 24 September 2013

उंबरखिंड, आंबेनळी, कुरवंडा घाट व परिसर

आज जवळपास ९ वर्षे  सह्याद्रीच्या वाट धुंडाळून देखील बरेच काही करायचे राहून गेलेय. मुंबई च्या जवळपास चे बरेचशे किल्ले भेटी देऊन झाले आहेत पण काही मोजक्या वाटा अजूनही आपली वाट पाहत आहेत. गेले काही दिवस मनात सल लागून राहिली आहे. सह्याद्री खुणावतोय, बोलावतोय त्याच्या अंगा खांद्यावर बागडायला पण वेळच मिळत नाहीये. कित्ती काय काय करायचय. कधी करणार?

दोन वर्षे पाठपुरावा करून एकदाचा मृगगड चा प्लान झाला. आम्ही पाच मित्र मृगगडाला भेट द्यायला निघलो. छोटेखानी टेहळणी चा  किल्ला असल्यामुळे लवकर आटोपला आणि परतीच्या वाटेवर खोपोली - पाली रस्त्यावरील शेमडी फाट्यावरून वाट वाकडी करून आत शिरलो - उंबरखिंडी च्या दर्शनाला. शिवरायांच्या इतिहासातील एक मानाचे स्थान आहे ते. तेथून पुढे छावणी गाव देखील पाहून आलो. गावाच्या अलीकडेच एक मामा भेटले. त्यांच्याकडे चौकशी केली, त्यांचा फोन नंबर घेतला अन परतीची वाट धरली ती पुन्हा तेथे येउन डोंगर पालथे घालण्याचे ठरवूनच.

सावरदांडेच्या वाटेवरून दिसणारा नागफणी (ड्युक्स नोज) चा कडा 
आता थोडसं इतिहासात डोकवायला हवं नाही का?
मुघल सरदार शाहिस्ताखानाने पुण्याहून त्याचा उझबेग सरदार कारतलब खान आणि एक मराठा सरदारीण - रायबाघन ह्यांना तीस हजार सैन्यानिशी कोकणावर पाठवलं. पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने येउन बोरघाटातून उतरण्याच्या बेतात असताना कारतलबखानाला खबर मिळाली कि शिवाजी राजा अगदी मोजक्या सैन्यानिशी  कोकणात पेण जवळ आहे. शिवाजी ला चकित करून त्याच्यावर झडप घालून जेरबंद करू अश्या विचाराने खान बोरघाट ऐवजी जवळच्याच आंबे नळीच्या घाटाने उतरला. सह्याद्रीतल्या घाटवाटांची कारतलबखानाला माहिती नव्हती. अचानक हमला होऊ नये म्हणून बोरघाटाने  न उतरता तो उंबरखिंडीने निघाला होता. उन्मादात हत्ती, घोडे, उंट, तोफा घेऊन त्याने किरर्र रानातली अवघड वाट निवडली होती. वास्तवात शिवाजी राजांनी आपल्या हेरांकडून खानापर्यंत हि माहिती पोहोचवली होती जेणेकरून खानावर उंबरखिंडी च्या गर्द रानात जोरदार हल्ला करता येईल. खान भुलला गनिमिकाव्याला व कोकणात उतरू लागला. सह्याद्रीला ढुश्या देताना हशामांच्या तोंडाला फेस आला. शिवरायांच्या फौजेने तोफांचे मोर्चे लावले. अचानक निरव शांततेला तडा गेला, शिंगे फुंकली गेली. हर हर महादेव चा गजर झाला. दिनांक होती २ फेब्रुवारी १ ६ ६ १.  स्वतः शिवाजी राजे व सरदार नेताजी पालकर यांनी खानच्या सैन्याला जंगलात चोहोबाजूनी घेरला व अचानक हल्ला केला. डाव स्वतःवरच उलटला होता. उंबरखिंडीच्या गर्द रानातून बाण कोसळू लागले, मुघल सैन्य सैर वैरा पळू लागले. जंगलात तलवारीचे घाव पडू लागले. कोणीही कुठूनही समोर येतो आणि मारून जातो. कुणाला काहीच पत्ता नाही. हाणामारी नुसती. पळून पळून जाणार कुठे? मुघल सैन्याची दाणादाण उडाली. हलकल्लोळ माजला. शरणागती … सपशेल शरणागती पत्करली कारतलबखानाने. रायबाघन चं एव्हडं तरी ऐकलं त्याने नाहीतर …
तीस हजाराच्या सैन्याने केवळ दोन हजार घोडेस्वारांसमोर सपशेल शरणागती पत्करली. अवघ्या ३ तासात खेळ संपला होता. कारतलबखानाने राजांची प्रत्येक शर्त मंजूर केली. राजांनी रायबाघन ला समज देऊन, साडी चोळी देऊन मान दिला. मुघल सैन्याचे अंगावरचे कपडे सोडून बाकीचे सर्व सामान ठेवून घेतले. मोठा विजय संपादन केला मराठा सैन्याने. उंबरखिंड समरभूमी झाली.

बेत ठरला.  फक्त २ मोटारसायकली ची सोय झाली असल्या कारणाने जास्त कुणाला न कळवता फक्त ४ जण जायचं असं ठरलं. त्यामुळे हरी मामांना फोन करून कळवलं आम्ही येणार असल्याचं. सह्याद्री च्या आडवाटांवरचा माझा सोबती मंदार सराफ, विनायक वंजारी अन मी असे तीन जण मोटारसायकलवर स्वार होऊन निघालो होतो उंबरखिंडीकडे. एकाने टांग दिली त्यामुळे शेवटी तिघेच. पनवेल ला पोटपूजा करून थोडेसे उशीराच म्हणजे सकाळी दहा वाजता चावणी गावात हरीमामांच्या घरी दाखल  झालो. हे चावणी गाव म्हणजे छावणी चा अपभ्रंश होऊन चावणी झालेलं. जेथे कारतलबखानाने तळ ठोकला होता म्हणे.

सावरदांड चढताना 
सकाळी १ ० वाजता ट्रेक ला सुरुवात झाली. हरीमामांना कुठली वाट घ्यायची त्याची कल्पना दिली होती. डावीकडे नागफणी डोके वर काढून होता. जणू सकाळचे उन अंगावर घेत होता. चालता चालताच अजून माहिती मिळू लागली.  बारमाही वाहणारी अंबा  नदी ओलांडून आम्ही सावरदांड च्या मार्गे चढू लागलो. कॅमेरा क्लिक क्लिक होऊ लागला. डोंगराच्या बेचक्यातली गर्द रानातली वाट, उभा चढ पण नावाला देखील वारा नव्हता. लगेचच घामाच्या धारा वाहू लागल्या. पण हे किर्र रान अनुभवायलाच तर आलो होतो येथे. उंबरखिंडी चा थरार पहायचा होता. अर्ध्या तासात आम्ही वरच्या पठारावर पोहोचलो अन थोडा विसावा घेतला. चौघात एक सफरचंद फस्त झालं. मामांनी रगतनाळे बद्दल सांगितला होतं, ती पहिली. म्हणे मराठ्यांनी मुघल सैन्यावर येथे मारा केला अन रक्ताचे पाट त्या ओहोळातून वाहिले म्हणून रगतनाळ म्हणतात. ह्याला इतिहासाचा आधार नाही, गावकऱ्या ने सांगितलेली माहिती आहे. 

 रगतनाळ
तेथून पुढे थोडे चढून आम्ही एका घनगराच्या घराजवळ आलो. पठारावर एकमेव घर, थोडी भातशेती आणि गाई-गुरे. ३० गोणी  भात पिकतो म्हणे पण दळण करायला खाली चावणी  गावात उतरून पुढे परळी गावात जावे लागते. दळलेले पीठ परळी - खोपोली - लोणावळा मार्गे टेम्पोने कुरवंडा येथे आणि मग पुढे घाट उतरून घरी आणावे लागते. क्षणभर स्तब्ध झालो मी हे ऐकून. केव्हडा हा व्याप? येथे का राहता असं विचारलं तर म्हणे एव्हडी जमीन आहे, भातशेती आहे, गुरे आहेत. वर कुरवंडा ला गेलो तर गुरांना  चरायला कुरण नाही वगैरे अनेक बाबी. मुले रोज कुरवंडा घाट  चढून शाळेत जातात.  

पठारावरील धनगर मामांचे एकुलते एक घर 
आंबे नळी घाटाची  माहिती मिळवली, धनगर मामांना टाटा  करून पठारावरून असेच पुढे निघालो तो त्यांच्या म्हशी एका डबक्यात डुंबत होत्या आणि माश्या त्यांना हैराण करत होत्या. संपूर्ण पठारावर सोनकीच्या पिवळ्या फुलांनी ठाण मंडळी होती. त्या हिरव्या पिवळ्या वाटेने आम्ही आंबे गावानजीक सरकत होतो. नागफणी (ड्युक्स नोज) डावीकडे डोके वर काढून रुबाब दाखवत होता. आंबे गाव म्हणजे फक्त ५-६ घरांची कातकरी वाडी. समोरच्या काळ्या कातळावर कुंपण दिसत होते तर उजवीकडे एक नाळ. हीच नाळ चढायची होती. नाळेच्या पायथ्याला शिवकालीन विहीर आहे असा मामा म्हणाले होते.

डुंबणाऱ्या म्हशी बघून त्यांचा हेवा वाटला पण जवळ जाताच कळलं, माश्या त्यांना किती त्रास देत होत्या. 

सोनकी च्या फुलांचा ताटवा होता संपूर्ण पठारावर. त्यातून जाताना मौज आली. 

आंबेनाळे कडे जाताना डावीकडे नागफणी डोके वर काढून रुबाब दाखवत होता.

आंबेनाळे च्या पायथ्याला शिवकालीन विहिरीच्या शोधात.

हरीमामा पण कधी आले नव्हते येथे. नालेच्या दिशेने चालत निघालो. नागडी पोरे ओढ्यात उड्या मारत होती. आमची चाहूल लागली तशी धावत सुटली, लपली. एकाला बोलावलं तर तो पण भिउन पळू लागला. नुसतं विहिरीच्या दिशेकडे बोट दाखवून पळत सुटला. २ मिनिटे चालल्यावर आंब्याखाली एक विहीर दिसली. चौकोनी, दगडांनी बांधून काढलेली पण सध्या देखभाली अभावी पडीक असलेली. आत रान माजले होते. थोडे पाणी होते त्यात पण पावसाळ्या पुरते टिकेल एव्हडेच.

शिवकालीन विहिरीच्या बांधकामाचे अवशेष.   

शिवकालीन विहिरीच्या बांधकामाचे अवशेष.   

फोटो काढले आणि आंबेनळी घाटाची वाट धरली. रस्ता दाट रानातून होता. शोधा शोध करत, काट्या कुट्या बाजूला सारत, मोठमोठाले दगड पार करत निघालो. आणि सही वाट मिळाली … खडकात खोदलेल्या पावट्या मिळाल्या. पण आनंद जास्त काळ टिकला नाही. पुढे लगेच वाट  दाट  झाडी मध्ये लुप्त झाली. थोडी फार शोधाशोध करून दुसरी वाट बनवून पुढे गेलो. ओहोळातून मोठ्या खडकांवरून चढून गेलो अन झाडीमध्ये पुन्हा वाट गवसली.

आंबेनळी ला जाताना खडकात खोदलेल्या पावट्या. 

नाळेतील खडकाळ वाट. 









आंबेनळी घाट सध्या वापरात नसल्याने पुष्कळ रान माजलं आहे. आंबे गावाहून पुढे INS Shivaji ला जाणारी वाट कुंपण घातल्यामुळे बंद झाली आहे त्यामुळे त्याचा वापर देखील बंद झालाय. पण त्याच मुळे तेथे गहिऱ्या निसर्गात बागडल्याचे समाधान मिळते. दोन दोन चिकू खाऊन तोंड गोड केलं सगळ्यांनी. घाटाच्या शेवटी आम्हाला पुन्हा काही कातळ कोरीव पायऱ्या सापडल्या आणि घाट पूर्ण झाल्याचं  समाधान मिळालं. सह्याद्रीतल्या घाट वाटांची माहिती व अनुभव असल्याखेरीज तसेच नवख्यांनी येथे जाणे टाळावे. सोबत वाटाड्या असल्यास उत्तम.

आंबेनळीच्या शेवटच्या टप्प्यावर कातळ खोदीव पायऱ्या लागल्या. 

आता पुढे कुंपणाला उजवीकडे ठेवत मार्गक्रमणा सुरु झाली. नाळे मध्ये दाट रान तर वर पठारावर हिरव्यागार गवतामध्ये तेरड्याच्या गुलाबी तर सोनकीच्या पिवळ्या फुलांचा ताटवा होता. सभोवतालचा परिसर डोळ्यात साठवून अन आल्या वाटेवर नजर फिरवून आम्ही थोडेसे चोरतच नागफणी ला समोर ठेवून निघालो. नागफणी चे ते रूप फार लोभसवाणे होते. कॅमेरा चे क्लिक क्लिक करत त्या फुलांच्या मधून वाट काढत आम्ही नागफणी च्या जवळ पोहोचलो. खालच्या पठारावर आंबे गाव तर दूरवर चावणी  गाव आणि त्यामागचे गार माळ चे पठार दिसत होते. कड्यावरून कोसळणारे धबधबे लक्ष वेधून घेत होते. एकूण निसर्गाचे ते लोभसवाणे रूप पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची रेषा दिसत होती.

आंबेनळी घाट संपून INS  Shivaji ला उजवीकडे ठेवून नागफणी च्या दिशेने जाताना प्रसन्न करणारे दृश्य. 




हरीमामा - आमचा वाटाड्या 

नागफणीच्या पदरात येताच खाली उतरणारी वाट दृष्टीस पडली. कोकणात उभेच्या उभा उतरणारा हाच कुरवंडा घाट. एव्हाना दुपारचे ३ वाजले होते. शेंगदाणे अन गुळाचे लाडू पोटात ढकलले आणि जीवाला फार बरे वाटले. इतका वेळ भूक विसरून आम्ही उंबर खिंडीचा परिसर पिंजून काढत होतो. वाटेमध्ये जागोजागी ओहोळ होतेच त्यामुळे पाण्याची वानवा नव्हती.

कुरवंडा घाट 





काही इतिहासकारांच्या मते कारतलबखान या कुरवंडा घाटाने उतरला होता. पण काही वर्षांपूर्वी हा ऐतिहासिक घाट कोकणातून घाटावर जाणारी पाईप लाईन टाकण्यासाठी फोडून काढलाय. हरीमामा जवळपास ३० वर्षांपूर्वी येथे घाटाचे काम करायला यायचे. घाट उतरायला सुरु केला. वाटेत जागोजागी सोनकीच्या फुलांचा बहर मनाला प्रसन्नता देत होता. मागे फिरून बघताना दिसणारा चढ मनात धुडकी भरत होता.



चावणी गावातून दिसणारे नागफणी चे विहंगम दृश्य. 

आभाळात काळे ढग दाटू लागले होते, पावसाची एखादी सर येऊ लागली होती, नागफणी मागे पडत चालला  होता. उजवीकडे आंबेनळी आणि त्यातून कोसळणारा जलप्रपात दिसत होता, निसर्गाचे मोहक स्वरूप डोळ्यात साठवत, इतिहासाशी संवाद घालत आम्ही सावरदांड, आंबेनळी आणि कुरवंडा अश्या तीन घाट वाटा पालथ्या घातल्या होत्या. पुन्हा एकदा अंबा नदी ओलांडून आम्ही संध्याकाळी ४ वाजता चावणी गावात हरीमामांच्या घरी स्थानापन्न झालो. मावशी ने थंडगार पाणी दिलं , दोन सफरचंद धडाधड पोटात गेले. दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर हरी मामांचे आभार मानून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. एकूण पायपीट करण्यास ६ तास लागले होते.

अंबा नदीवरील रांजण खळगे. 

अंबा नदीवर एके ठिकाणी रांजण खळगे आहेत. निसर्गाचा अजून एक अविष्कार पाहून, समरभूमीचे, तेथील स्मारकाचे दर्शन घेऊन घरचा रस्ता धरला.

समरभूमी - उंबरखिंड स्मारक 

अधिक छायाचित्रांसाठी क्लिक करा -
 https://picasaweb.google.com/112424448078863794767/AambenaliKurvandaGhat

8 comments:

  1. Excellent...Mast Lihilayes...and keep writing from now on...!!

    ReplyDelete
  2. Khup chan re Sameer , mala heva watato tumcha hya babtit......keep exploring :)

    ReplyDelete
  3. तुम्ही लिहिलेला लेख छान आहे आहे. तुम्हाला असलेल्या आवडीसाठी आणखी एक ठीकाण सुचवतो
    वरंधा घाटाच्या जवळ रामदास पठार गाव आहे.शिवथर प्रांतातील समर्थांचे वास्तव्य तेथे होत अशी ऐतहासिक कागदपत्रात नोंद सापडते.त्या गावातील विहीर ही शिवकालीन आहे. शिवाय खरी शिवथरघळ पण तेथे आहे. अशा ठिकाणी भेट देण्यास आवड असल्यास अवश्य भेट द्यावी.
    अधिक माहिती करीता गूगल वरून realshivtharghal blog वर मिळेल

    ReplyDelete
  4. तुम्ही लिहिलेला लेख छान आहे आहे. तुम्हाला असलेल्या आवडीसाठी आणखी एक ठीकाण सुचवतो
    वरंधा घाटाच्या जवळ रामदास पठार गाव आहे.शिवथर प्रांतातील समर्थांचे वास्तव्य तेथे होत अशी ऐतहासिक कागदपत्रात नोंद सापडते.त्या गावातील विहीर ही शिवकालीन आहे. शिवाय खरी शिवथरघळ पण तेथे आहे. अशा ठिकाणी भेट देण्यास आवड असल्यास अवश्य भेट द्यावी.
    अधिक माहिती करीता गूगल वरून realshivtharghal blog वर मिळेल

    ReplyDelete