Pages

Monday 27 January 2014

खडसांबळे - नाळेची वाट - घनगड - नाणदांड घाट

खडसांबळे - नाळेची वाट - घनगड - नाणदांड घाट

ठरलेले बेत आटोपते घेत अचानक एखादा फार वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या वाटा धुंडाळण्याचा योग अलगदपणे जुळून येतो तसंच काहीसं झालं. जास्त खोलात शिरत नाही. २६ जानेवारी च्या मुहूर्तावर  मंदार सराफ, गौरव भोसले, अमेय बेहरे आणि मी दादर ला भेटून अमेय च्या गाडीने जायचं ठरलं. शुक्रवारी आफिसातलं काम आटोपून तसाच दादर ला प्लाझा सिनेमागृहासमोर मी अन मंदार बाकीच्या दोघांना भेटलो. 'कुटुंबसखी' च्या दुकानातून पुरणपोळी, गुळपोळी बांधून घेतली आणि गाडीत बसल्या बसल्या सगळ्यात पहीलं काम केलं  ते सोबत बांधून आणलेल्या गरमा गरम बटाटा वड्यांवर यथेच्छ ताव मारला.

ह्या शनिवार - रविवार चा बेत ठरला होता, 'ठाकूरवाडी - खडसांबळे लेणी - नाळेची वाट - केवणी - एकोले - घनगड - केवणी - नाण दांड घाट - ठाकूरवाडी' अशी तंगडतोड करण्याचा. खोपोली जवळ अमेय च्या फार्महाउस वर जाऊन राहून सकाळी ६ वाजताच निघायचे अन सुधागडच्या पायथ्याच्या ठाकूरवाडी मध्ये पोहोचायचे असे ठरले.

दिवस पहिला -

रात्री उशीरापर्यंत मज्जा केली असल्या कारणाने साहजिकच झोपेचा फज्जा उडाला होता. निघायलाच ७ वाजले, पाली जवळ बटाटावडा आणि चहा घेऊन ठाकूरवाडी कडे कूच केले. गावात म्हातारबाबांकडे थोडी चौकशी करून आणि गाडी तेथेच ठेवून आमचा ट्रेक सुरु झाला. डावीकडे सुधागड चा गोलाकार बुरुज आणि त्याखालची शिडी खुणावत होती. टकमक टोक रुबाब दाखवत उभा होता. मागच्या पठारावर तेलबैला चा सुळका उत्तुंग दिसत होता. ठाकूरवाडी पासून नदीचे जवळपास सुकलेले पात्र ओलांडून खडसांबळे गावात पुढच्या १० मिनिटात पोहोचलो. गावात चौकशी केल्यावर एक जण म्हणाला - 'तो म्हातारा बघा, घेऊन जाईल तुम्हाला. प्रत्येक वेळी तोच घेऊन जातो सगळ्यांना'. त्या वृद्ध गृहस्थांना विचारताच ते तयार झाले. पाण्याची बाटली अन कमरेला विळा खोचून तयार होई पर्यंत आम्ही गावातल्या मंदिराला भेट दिली आणि हापशीवर पोटभर पाणी पिउन घेतले. सकाळचे १० वाजले ट्रेक ला सुरुवात करण्यासाठी.  चालता चालताच मामांना माहिती साठी प्रश्नावली सुरु झाली - लेण्या किती आहेत? पाहायला काय काय? वेळ किती लागणार? वगैरे.  तर मामा म्हणे - आमचा जन्म व्हायच्या आधीच्या लेणी आहेत. पहायला काय? जे आहे ते पाहायचं. तुम्हाला दोन तास लागतील.

या डोंगराच्या उजवीकडे खडसांबळे च्या लेणी आहेत  
कोतवाल पक्षी शेपूट उडवत एका झाडावरून दुसऱ्यावर जाऊन बसत होते, मध्येच पोपटांचा थवा वीट-वीट करत उडताना दिसत होता. पंधरा मिनिटात वरच्या वाडीत पोहोचलो. मंदार ने GPS मार्किंग केले, समुद्र सपाटी पासून ची उंची ८० मीटर. टेकाड चढून, एक ओहोळ ओलांडून लेण्यांच्या दिशेने आमची स्वारी निघाली होती. मामांचे वय ८० पेक्षा थोडे जास्त पण न थांबता तुरुतुरु चालताना मात्र दमवलं त्यांनी आम्हाला. आम्ही देखील विनाथांबा खडसांबळे च्या वाटेला चढत होतो. मध्येच झाडी, मध्येच उघड्या पाठरावरचा चाल असं करत एकदाचे दाट जंगलात शिरलो. आमच्या चालण्याचा वेग पाहून मामा म्हणाले - तुम्ही अर्धा-पाऊण तासात पोहोचाल. गेल्या आठवड्यात आले त्यांनी थांबत थांबत दोन तास लावले होते.

जंगलात चालताना पाखरांचा किलबिलाट व अनोळखी फुलांचा सुवासिक गंध मनाला प्रसन्नता देत होता. जसजसे लेण्यांच्या जवळ पोहोचलो, तसा चढ उभा होत गेला अन शेवटी पायऱ्या लागल्या. सभोवताली बऱ्यापैकी झाडांचे आच्छादन होते. समोरचे भले मोठे लेणे म्हणजे चैत्यगृह आहे, त्यात एक स्तूप व तीनही बाजूस अनेक छोट्या खोल्या आहेत. स्तूपावर कुणीतरी 'ओम' चितारला आहे. मी आणि मंदार ने कॅमेरा चा क्लिकक्लीकाट सुरु केला व अक्खा परिसर पिंजून काढला.

मुख्य लेणी - चैत्यगृह 
चैत्यगृह व स्तूप 
खडसांबळे लेणी
लेण्यांची दैनावस्था 
बरीच पडझड झालेली आहे. दरड कोसळून काही लेणी बुजली गेली आहेत तर जी आहेत त्यातील खांब व भिंती तुटल्या आहेत. दोन लेण्यांमध्ये अक्षरशः सरपटत जावे लागले. गुहांच्या तोंडावरच दोन-तीन हत्तींच्या आकारा एव्हडा भलामोठा प्रस्तर कोसळला आहे. आणखी दोन लेण्यांचे तोंड तर पूर्णपणे बंद झालेले. काही लेण्यांमध्ये भिंतींवर (काळा, पांढरा आणि लाल रंगाने) रंगरंगोटी केल्याच्या खुणा दिसल्या त्यामुळे प्राचीन काळी नक्कीच त्या सुंदर व वैभवात नांदत असणार ह्यात शंका नाही. पण सध्याची त्यांची अवस्था खूप वाईट. 

आजूबाजूला मिळून २० लेण्या सापडल्या. दोन सुकलेली पाण्याची टाकी होती तर काही ठिकाणी दगडात कोरलेल्या पायऱ्या. अप्रतिम अश्या निवांत जागी खोदलेल्या या बौद्ध लेण्या आज शेवटच्या घटका मोजत कसेबसे तग धरून आहेत. कधीतरी कोणी एखादा ट्रेकर त्यांची विचारपूस करायला येतो तेव्हडाच काय तो दिलासा. बाकी गावकरी तेथे फिरकत देखील नाहीत. नावाला ASI चा गंजलेला फलक मात्र आहे. खिन्न मनाने लेण्यांचा निरोप घेऊन तासाभराने आम्ही निघालो. अमेय आणि गौरव ची राहिलेली झोप पूर्ण झाली होती.

खालच्या जंगलात पुन्हा एकदा रानफुलांच्या मोहक सुगंधाने प्रसन्नता बहाल केली. पठारावर येउन आता आम्ही डोंगराला उजवीकडे ठेवून आडवे चालू लागलो. दुपारचे १२:३० वाजले होते अन उन्हाच्या झळा जाणवू लागल्या होत्या. नाळेची वाट दिसू लागली. ओढा ओलांडून नाळेच्या पलीकडे जाऊन मग वर चढायचं होतं. नाळेला उजवीकडे ठेवून मळलेली वाट आहे जी पुढे नाळेत शिरते. खालच्या नाळेत काही लोक बंधारा बांधत होते. त्यांच्याकडे विचारपूस केल्यावर कळले कि फारेस्ट कडून ओढ्यावर बंधारा घातला की रू ८०/- प्रति मीटर मिळतात. इतस्ततः विखुरलेले दगड गोळा करून त्या व्यक्तीने दुपारपर्यंत एकट्याने १० मीटर लांबीचा बंधारा पूर्ण केला होता. ऐकून अचंबित झालो.

पठारावरून नाळेच्या वाटेला जाताना. नाळ ओलांडून पलीकडे जाऊन वर चढावे. 
एव्हाना दुपारचा १:३० वाजला होता आणि मामांसोबतचा करार संपत आला होता. खालून खडसांबळे गावातून येणाऱ्या वाटेला मिळालो. त्यांची २०० रुपये मजुरी देऊन आणि नाळेची कल्पना घेऊन आम्ही चौघेच खड्या चढणीला लागलो आणि मामा गावाकडे. उन्हामुळे आणि कालच्या अधुऱ्या झोपेमुळे आमचे हाल होऊ लागले असतानाच वाऱ्याने दडी मारली होती. घामाघूम झालेल्या शरीराला भरपूर पाण्याचा डोस दिला. थोड्या चढणीनंतर नाळेत शिरताच वाऱ्याचा झोत अंगावर आला आणि थोडा झाडोरा लागला त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी जाणवली. थांबत थांबत चढाई सुरु होती. नळी संपता संपता झाडी जास्तच वाढली अन रानफुलांचे परागीभवन आमच्या मार्फत होऊ लागले. शर्टवर, केसांवर, हातावर, ठिकठिकाणी हे रानफुलांचे परागकण चिकटत होते. सूर्यराव आग ओकत असताना सुखावह म्हणावे असे एकच काय ते डावी - उजवीकडील व मागच्या नाळेतले दृश्य होते.

नाळेची वाट चढून आल्यावर मागे वळून बघताना 
केवणी चे पठार जवळ येऊ लागले तशी आम्हाला घाई होऊ लागली. पठारावर पोहोचल्यावर जीव एकदाचा भांड्यात पडला. सुधागड चे पठार नजरेसमोर दिसत होते. आता आम्ही सुधागड च्या उंचीवर होतो म्हणजेच समुद्रसपाटी पासून जवळपास २२०० फूट उंचीवर. म्हणजेच जवळपास १९०० फुटांची चढाई झाली होती तर. येथे आमची चढाई संपली होती पण खरा शीण घालवला तो वरून दिसलेल्या सह्याद्रीच्या कड्यांनी. नाळेच्या वाटेवर नजर टाकली, छायाचित्रे घेतली आणि मग पालथे होऊ पाहणाऱ्या शरीराला बिलकुल आवर न घालता झाडाखाली एका मोठ्या दगडावर स्वतःला टेकवलं.

नाळ चढून केवणी च्या पठारावर आल्यावर समोर दिसणारा दिसणारा सुधागड 
एकेक करत चिक्की, गुळपोळी, ठेपले, ढोकळा, कचोरी बाहेर येऊ लागले, हातात पडताच गट्टम होऊ लागले. अक्ख्या वाटेत कुठेही पाणी मिळालं नव्हतं. सोबत असलेली शेवटची पाण्याची बाटली सगळ्यांनी मिळून संपवली अन केवणी गावाकडे कूच केले. दुपारचे ३:०० वाजले होते. उघड्या माळरानावर पिवळे-सोनेरी गवत डौलत होतं. झाडोबा नसले तरी ह्यावेळेस ढगोबा न सांगता आमच्या मदतीला धावून आले होते. सुर्यरावांच्या धगीपासून ढगोबा आमचे रक्षण करत होता. मनातल्या मनात त्याचे शतशः आभार मानून १५ मिनिटांच्या पायपिटीनंतर आम्ही केवणी गावात पोहोचलो.

केवणी गावातील सखुबाई ढेबे यांचे घर 
सखुबाई ढेबे नावाच्या गृहिणीने आमची विचारपूस करून थंडगार पाणी दिले. मोजून १० घरे आणि २०-२५ डोकी असलेल्या ह्या वाडीतले लोक मजुरी करून आपली गुजराण करतात. मजुरीसाठी एकतर तासभर चालत एकोले अथवा त्यापुढच्या भांबर्डे गावात जातात अथवा खाली कोकणात, पाली जवळ. गावात भरपूर गुरे ढोरे अन कोंबड्या. शेती होत नाही कारण पाणी खूप लांबून आणावं लागतं. गावाच्या आजूबाजूस भरपूर झाडे. गावात एक शाळा देखील आहे. पण शिकायला मुलेच नसल्यामुळे शाळेची घंटाच होत नाही. भरपूर पाणी पिऊन, थोडं बाटलीत भरून घेतलं. पाच-दहा मिनिटांच्या विश्रांती नंतर आमची स्वारी घनगड च्या दिशेला निघाली.

घनगड चे पठार आणि केवणी च्या पठारामधील खिंड व त्यातील चिंचोळी वाट, उजवीकडे घनगड 
दूरवर दृष्टी क्षेपात असलेला घनगड दुसऱ्या पठारावर आहे. केवणी च्या भल्यामोठ्या पठारावरून एका खिंडीत उतरून पुन्हा दुसऱ्या पठारावर चढावे लागते. येथून सभोवतालचे जे दृश्य दिसते ते केवळ अवर्णनीय. मावळतीला सुधागड चा माथा दिसत होता, तेलबैलाचा माथा संध्याकाळच्या उन्हात उजळत होता. दरीतले डोंगरकडे धुरकट दिसत होते. दूरवर घनगड चा बुरुज व कातळ कडा बुलंद उभा होता. उजवीकडची खोल दरी भयावह होती. त्यातले हिरवेजर्द रान पाखरांच्या चिवचिवाटाने जिवंत झाले होते. संध्याकाळचा शीतल वारा अन ढगोबांची छत्रछाया आमची रपेट सुखावह करीत होते. पाकोळ्यांच्या किलकिलाटा सोबत कॅमेरा चा क्लिकक्लिकाट सुरु होता. सह्याद्रीच्या खांद्यावर खेळता खेळता वेळेचे भान राहिले नव्हते.

जसजसा घनगड जवळ येऊ लागला तसतसा तो अधिकाधिक मोठा भासू लागला. त्याचा भेदक कातळ कडा त्याच्या भव्यतेची व कठीणपणाची जाणीव करून देऊ लागला. घनगड ला उजवीकडे ठेऊन वळसा मारून आम्ही तासाभराच्या चाली नंतर एकोले गावात पोहोचलो. अंधार दाटून येऊ लागला होता. गावातील शाळेत सामान ठेऊन शेजारच्याच प्रकाश कडू यांच्या घरात रात्रीच्या जेवणाची सोय केली. मुक्कामास मारुतीरायाचे देऊळ देखील होते. त्यात २० जण आरामात झोपतील एव्हडी जागा होती.

पोहोरं घेऊन आमची स्वारी निघाली आता विहिरीकडे. दोन दोन पोहोरं थंडगार पाणी डोक्यावरून सोडल्यावर जी अनुभूती थकल्या भागल्या जीवास होते ती शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य. नव्या चैतन्याने आम्ही मारुती मंदिरापाशी गेलो. गौरव ने कुठून वाळकी लाकडे गोळा करून आणली अन आम्ही सगळ्यांनी मिळून शेकोटी पेटवली. दिवसभराच्या उन्हाच्या तापापेक्षा हा अग्नीचा ताप भलताच सुखदायक होता. प्रकाशरावांची हाक आली आणि त्यांच्या शेणाने सारवलेल्या अंगणात मस्त गरमागरम जेवण वाढलं गेलं. चपाती, पोकळ्याची पालेभाजी, कडव्या वालाची आमटी, भात अन कांदा. वाहव्वा !! गौरव ने त्याच्या आणि अमेय साठी अंड्याची भुर्जी करून स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवून घेतले. लाल्या अन टिक्क्या (बैलजोडी) ला दोन घास ठेवले. ढेकर, जांभई आणि आळस हे लगोलग आलेच.

एव्हडे झाल्यावर आम्ही थांबतोय कशाला? सरळ मारुतीच्या मंदिरात जाऊन पथारी टाकली अन स्वतःला निद्रादेवीच्या स्वाधीन करून टाकले.

दिवस दुसरा -

सकाळच्या बोचऱ्या वाऱ्याने सकाळी ४:३० वाजताच झोप पळवली. तासभर कूस बदलून शेवटी उठलोच ६ वाजता. मी आणि मंदार 'डब्बा टाकून' तयार झालो. गौरव ला कसबसं उठवलं. तो एक 'फुकणी' मारून लगेच ताजातवाना झाला. अमेय ने असमर्थता दाखवल्याने आम्ही तिघांनी घनगडा कडे कूच केलं. वाटेतच गौरव अडखळला. त्याचा पाय ससे - खार पकडण्या साठीच्या सापळ्याला लागला होता. पारध्याला शिव्या घालत सापळा तोडून टाकला. पुढे अजून एक असाच सापळा दिसला, त्याची देखील तीच गत केली. मुळशीच्या पश्चिमेकडील कोरबारसे मावळातला घनगड तसा छोटेखानी किल्ला. एकोले गावातून १५ मिनिटात गारजाई देवीच्या देवळात आणि ५ मिनिटात खिंडीत पोहोचलो.

एकोले गावातून दिसणारा छोटेखानी घनगड 


वाऱ्याने झंझावात सुरु केला होता त्यामुळे जणू प्रसन्न मनाला घनगडा च्या अंगा-खांद्यावर बागडायला जणू स्फुल्लिंग चढलं. खिंडीतून डावीकडे जात खालची खोल दरी न्याहाळली. तेथे लक्ष ठेवण्यासाठी कड्यात एक गुहा खोदलेली आहे. तेथे पोहोचण्यासाठी कड्यात पावट्या खोदल्या आहेत. गुहा पाहून गडाच्या मुख्य दरवाज्या पाशी पोहोचलो. गडाच्या तटबंदीवर डागडुजी केली आहे. दोन मोठाल्या बुरुजांच्या मध्ये दरवाजा, त्यात चढण्यासाठी पायऱ्या आहेत. आता आम्ही बऱ्यापैकी सपाटीवर आलो होतो. समोरच कातळात दोन गुहा खोदल्या असून डावीकडे गडाच्या वरच्या भागात जाण्यासाठी लोखंडी शिडी लावली आहे. येथे कधी खोदीव पायऱ्या असाव्यात ज्या ब्रिटीशांनी उध्वस्त केल्या आहेत. येथे २० फुटाचे सोपे प्रस्तरारोहण करून वर जाता येत असे. शिवाजी ट्रेल नामक संस्थेने तो मार्ग अधिक सुकर व्हावा या उद्देशाने ती शिडी बसवली आहे. त्यांनी बरेच ठिकाणी केलेल्या दुर्ग संवर्धनाच्या कामाच्या खुणा दिसून आल्या. शिडीने वर चढताच दोन मधूर पाण्याची टाकी आहेत. डाव्या हाताला गेल्यावर अजून तीन मोठाली खांब टाकी व गुहा आहेत. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी अजून एका अप्रतिम दरवाज्यातून चढावे लागते. आजमितीला दरवाजाच्या  शेजारचे बुरुज व भिंती तेव्हड्या उभ्या आहेत. उच्च स्थानी पूर्वेकडे भलामोठा बुरुज असून बरेच ठिकाणी बांधकामाचे अवशेष विखुरलेले आहेत. बालेकिल्ल्यावर तीन पाण्याची टाकी देखील आहेत. संपूर्ण किल्ल्यावर ८-१० पाण्याची टाकी आणि ६ गुहा आहेत. बरीच शोधाशोध करून पहिल्या दरवाज्या जवळची चीपेखालची महिषासुरमर्दिनी ची मूर्ती सापडली. त्यापुढे कड्यावर अवघड अश्या अप्रतिम जागी पाण्याचे टाके दिसले. त्यातील चविष्ट पाणी पिऊन तृप्त झालो. घनगडा वरून चौफ़ेर सालतरची खिंड, तेलबैला, सुधागड, केवणी चे पठार, दक्षिणेकडची अक्राळ विक्राळ दरी असं विहंगम दृश्य नजरेस पडतं. टुमदार एकोले गाव छान दिसत होतं.


घनगड वरून दिसणारे विहंगम दृश्य 
इतका जबरदस्त नजारा डोळ्यांत साठवून अन कॅमेरात उतरवून परतीची वाट धरली. गारजाई देवीचे दर्शन घेऊन आम्ही १५ मिनिटांत गावात पोहोचलो. अमेय आमचीच वाट पहात होता. प्रकाश भाऊंच्या घरी नाश्त्यासाठी कोबीची भाजी अन तांदळाची भाकर बनवली होतीच पण जिभेच्या चोचल्यांसाठी अमेय ने पटापट पाच अंड्याचे ऑम्लेट बनवले. स्वयंपाकघरातच त्यावर धाड पडली, पेलाभर दूध पोटात गेलं अन पिठ्ठू पाठीवर ठेवून आम्ही केवणी कडे निघालो. आल्या वाटेनेच केवणी पर्यंत जायचे होते आणि तेथून पुढे नाणदांड घाटाने खाली कोकणात. पुन्हा एकदा गवताळ पठारावरून तंगडतोड सुरु झाली. 

केवणी च्या पठाराकडे जाताना - मागे दरी पलीकडचा तेलबैला चा मनमोहक सुळका 
सह्याद्री चे रौद्र कडे आणि तेलबैला चे मोहक रूप. होऊ देत क्लिकक्लिकाट… 
केवणी च्या पठारावर जायच्या आधी खिंडीजवळ मनसोक्त फोटोग्राफी करून घेतली. पुन्हा एकवार सखुबाई ढेबे मावशींकडे आम्ही थंडगार पाणी पिऊन, नाणदांड घाटाची वाट विचारतोच तो एकोले च्या प्रकाश कडू नी आम्हाला हाक मारली. केवणी मध्ये काही कामानिमित्त येण्यास आमच्या मागोमागच ते निघाले होते. कालच्या सोनेरी - पिवळ्या दिसणाऱ्या त्या गवताला रात्री कुणीतरी आग लावली होती त्यामुळे आज आमची वाट काळ्या कुट्ट पठारावरून जाऊ लागली. उन्हाच्या तडाख्यातून निभावून घेण्यासाठी चारही मावळे अरबी बनले होते. अश्या वातावरणात ससाण्यांची मेजवानी सुरु होती. पठारावर जवळपास आठ - दहा ससाणे भरारी मारताना दिसले. प्रकाश भाऊंनी लगेच आम्हाला घाटाच्या वाटेवर लावून दिलं अन सांभाळून जा म्हणत, न थांबता गेलात तर तासाभरात खाली पोहोचाल असं सांगून ते निघून गेले. इथून घाटाची वाट भलतीच उभी वाटत होती. मंदार ने GPS मार्किंग केलं. ५६६ मीटर म्हणजे जवळपास १८९० फूट उंचीवर आम्ही अगदी कड्यावर उभे होतो.  वाट निमुळती होती पण जंगलात शिरत होती. 
नाणदांड घाटाची सुरुवात, समोर सुधागड दिसतोय 

लागलीच भयानक उतार लागला. जणू काही मागून कुणी धक्का मारतंय. थोडासा घसारा होता पण डोक्यावर उन लागत नव्हतं. सांभाळतच आम्ही उतरू लागलो. उभा उतार असल्यामुळे झटक्यात आम्ही मोठा टप्पा उतरून आलो होतो. दाट रानातून उतरणारी वाट अचानक मोकळ्या पठारावर आली अन तेथून डावीकडचा डोंगरकडा भयानक दिसू लागला. एकवार मागे वळून पुढच्या खेपेस लक्षात राहावी म्हणून वाटेच्या खाणाखुणा पाहून घेतल्या. नागमोडी वळणे घेत वाट पुन्हा जंगलात गेली. पाऊण -एक तासाच्या उतरणी नंतर एका मोकळ्या जागी ओढ्याकाठी आम्ही आलो. पाठीवरचे पिठ्ठू मोकळे केले, बाटलीभर पाणी प्यायलो अन डोळ्यात ते घनदाट जंगल साठवू लागलो. पुन्हा एकदा सह्याद्री च्या घाटवाटेची उतराई सुरु झाली. घाटवाट ज्या दांडावरून उतरत होती तो दांड आता स्पष्ट दिसू लागला होता. समोर सुधागडचे  टकमक टोक उंच होऊ लागले होते, तेलबैला दूर दूर जाऊ लागला. मागे वळून पाहताना चेहऱ्यावर नकळत हास्य खुलू लागले होते. नदीचे पात्र जवळ दिसू लागले. कधी पानगळ झालेली तर कधी हिरवीगार अश्या अनेक झाडांचा अनोखा मिलाफ दिसत होता. ढगोबांची छत्रछाया पुन्हा एकदा डोईवर आली होती. 
नाणदांड घाटाचा मार्ग मागे वळून पाहताना 
नाणदांड घाट संपून नदीच्या पत्रात प्रवेश करताना
नदीच्या पत्रात वाहते पाणी असूनही पाण्यात बुचकळण्याचा मोह, वेळेच्या अभावी आवरता घेतला. ठाकूरवाडी समोरच्या टेकडावर दिसत होती. शेताडातून वाट तुडवत जाताना तो शेवटचा छोटा चढ नकोसा वाटू लागला. पोटातले कावळे जागृत झाले होते त्यांना शेंगदाण्याच्या चिक्कीचा पिंड दाखवला. एकदाची ठाकूरवाडीतील कुडाची, सिमेंट विटांची घरे लागली, कोंबड्यांची कॉक कॉक, चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकू आला. गावातून मागे वळून पाहताना, चढाई केलेला नाळेचा मार्ग आणि उतराई केलेला नाणदांड घाट, दोन्ही दिसून आले.
ठाकूरवाडी गावातून दिसणाऱ्या दोन घाट वाटा -  नाणदांड घाट आणि नाळेची वाट
सह्याद्रीच्या या सफरी मध्ये अनेक नवीन अनुभव गाठीला जोडले गेले. प्रत्येक खेपेस भेटणारा सह्याद्री, यावेळेस त्याचं अजून एक रांगडं रूप दाखवून गेला. पुढील खेपेला नवीन काहीतरी दाखवेन म्हणाला. याच आशेवर धूर ओकणारी आमची गाडी, सिमेंट च्या जंगलात लुप्त झाली.

नकाशा - https://mapsengine.google.com/map/edit?mid=z0CM_-Mz1UCs.kGFJvL0I7c8Q

छायाचित्रे - Photographs of Khadsambale Caves & Nandand Ghat Trek

4 comments:

  1. वैराग्य घ्यावं आणि सहयाद्री ला जीवन अर्पून द्यावं....त्याचा प्रत्येक कानाकोपरा हिंडावा आणि जीवन व्यतित कराव ,खूप सुंदर लिहिला आहे समीर असाच लिहित जा आणि तुझे अनुभव लिहित जा , त्या निमित्ताने आम्हालाही जरा सह्याद्री चं दर्शन होईल

    ReplyDelete
  2. khup chan hote he sarva....
    naakich bhet dhyavi vatate...

    ReplyDelete